Satara : ग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

कोरेगाव : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन राज्य शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकर्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी योजना आणली गेली आहे. केंद्र शासनाची ग्रीस्टॅक ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली गेली आहे. कोरेगाव येथे शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन त्यासाठी करण्यात आले आहे. सर्व शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.
शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागामार्फत कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह आवारात शुक्रवार दि. 7 व शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या नोंदणी शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
प्रकल्पामुळे माहिती आधारीत योग्य निर्णय घेणे, गरजू शेतक-यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे. सर्व शेतक-यांनी मोबाईल क्रमांकास आधार जोडणी करून घ्यावी, जेणेकरून शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्याची प्रक्रीया सोप्या पध्दतीने होईल.
भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीक विमा, कृषी विभागाच्या सर्व वैयक्तीक लाभाच्या योजनाच्या लाभासाठी सर्व शेतक-यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील नोंदणी शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. शिंदे यांनी केले आहे.



