Satara : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत सेंट झेविअर्स अव्वल

भिलार : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेच्या माध्यमिक गटात पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते शाळेला तीन लाख रुपयांचा धनादेश, सन्माचिन्ह व सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद आणि महाबळेश्वर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने मंगळवारी पाचगणी येथील न्यू इरा हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात हे बक्षीस देण्यात आले. शिक्षण संचालक महेश पालकर, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, सपोनि दिलीप पवार, अभियंता देशपांडे, डॉ. तेजस्विनी भिलारे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून अल्पावधीत नावारूपाला आली आहे. शाळेचे संचालक फादर टॉमी व मुख्याध्यापक फादर साबू यांचे मार्गदर्शन व प्रयत्नांमुळे ही शाळा शिस्त, गुणवत्ता, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधील प्रावीण्यामुळे पाचगणीतील उत्कृष्ट शाळा ठरली आहे. या वर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शिक्षणाची पंढरी असलेल्या पाचगणी, महाबळेश्वरमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील उत्कृष्ट शाळा म्हणून सेंट झेवियर्सचा गौरव करण्यात आला. ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम, संकल्पना राबवून, विविध अभियानांमध्ये सहभागी होते.
शाळेची उत्कृष्ट व भव्य इमारत, शैक्षणिक व भौतिक सुविधा, सुसज्ज मैदाने, सुंदर बगीचा, ट्री हाऊस, स्विमिंग पूल, परसबाग, डेअरी फार्म, सभागृह, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, उत्तम सुरक्षा व वैद्यकीय सुविधा, स्मार्ट बोर्डस्, सुसज्ज प्रयोगशाळा, तालुका, जिल्हा व विभाग स्तरावरील स्पर्धांमध्ये निवड, नॅशनल लेव्हल इन्स्पायर अॅवॉर्डसाठी निवड, इयत्ता 10 वी व 12 वीचा 100 टक्के निकाल, इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या समित्या स्थापन करून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापन करत असल्याचे फादर टॉमी यांनी सांगितले.





