Satara : शिवसेनेचे विचार घराघरांमध्ये पोहोचवा

सातारा : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन शिवसेनेचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवावेत, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणजितसिंह भोसले यांना दिला.
रणजितसिंह भोसले यांची ३१ मे रोजी शिवसेनेच्या सातारा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्रालयातील कामकाजानंतर सातारा जिल्ह्यातील दरे गावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत असताना साताऱ्यात आले होते. त्यावेळी रणजितसिंह भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
हिंदुत्वाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे काम निष्ठेने करणारे आणि शिवसेेना वाढवणारे जिल्हाप्रमुख म्हणून रणजितसिंह यांच्याकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचा विचार रणजितसिंह यांचे वडील नानासाहेब भोसले यांनी ज्याप्रमाणे वाढवला आणि रुजवून अंगिकारला. त्याचप्रमाणे आता कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनुसार रणजितसिंह भोसले यांनीही आपली वाटचाल राजकारणात ठेवली, त्यामुळेच जिल्हाप्रमुखपदी काम करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
रणजितसिंह भोसले यांचे वडील नानासाहेब भोसले सुरवातीच्या काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेले आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून रणजितसिंह यांनी जिल्ह्यात युवा सेना जोमाने वाढवली. पक्ष संघटन, कार्यकर्त्यांना बळ देणे, सर्वसामान्यांच्या हिताची काम करणे याबाबत त्यांचा संघर्ष सुरु असतो. असे यावेळी सांगण्यात आले.
स्थानिक संस्थांच्या निवडणुकात
रणजितसिंहावर मोठी जबाबदारी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता शिवसेनेनेही आक्रमक पध्दतीने बांधणी सुरु केली आहे. जिल्ह्यात पक्षवाढीच्या जबाबदारीबरोबर शिवसेना पक्ष वाढविण्याबाबत मायक्रोप्लॅनिंग केले आहे. याची मोठी जबाबदारीही रणजितसिंह भोसले यांच्यावर समन्वयक म्हणून दिली आहे. ती निश्चितच पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांचा सत्कार करताना व्यक्त केला.





