सातारा – विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासासोबत मातीशी नाते जोडून स्वतः मधील क्रीडा कौशल्यांचा विकास करावा. मैदानी खेळांना आपल्या जीवनात खूप महत्त्व असून खेळामुळे सर्वांगीण शारीरिक व्यायाम होत असतो. खेळामुळे मन, मनगट आणि बुद्धी यांचा योग्य समन्वय राखला जातो, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी व्यक्त केले. शाहूपुरी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या बालकामंदिर, अभिनव विद्या मंदिर व अभिनव माध्यमिक विद्यालय या तीनही शाखांच्या संयुक्त २७ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी तारळकर बोलत होते. यावेळी रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. वाय. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी होते. संस्थेचे संचालक अनंत जोशी, गुरुमितसिंग रामगडिया, दीपक अग्रवाल, मुख्याध्यापिका पी. डी. गावडे, मुख्याध्यापक एस. जे. सापते, बालवाडी प्रमुख एन. ए. चोरगे, क्रीडा महोत्सव प्रमुख एस. डी. जाधव उपस्थित होते. आर. वाय. जाधव म्हणाले , विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात स्वतः ची कौशल्य विकसित करताना आवडीच्या खेळावर श्रद्धा ठेवून निष्ठेने प्रयत्न केले पाहिजेत. सरावात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर भविष्यात उत्तम खेळाडू तयार होवू शकतात. मैदानी खेळामुळे मन प्रसन्न राहून शरीर मजबूत होते. ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत. राज्यस्तरीय रोलर स्केटींग, रोलबॉल या खेळ प्रकारात यश संपादन केलेली अश्लेषा अमोल गोसावी, मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सिध्देश कुर्णे व मैथिली कुर्णे यांचा सत्कार करण्यात आला. वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमास क्रीडाप्रेमी, संस्थेचे ठेवीदार व देणगीदार, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संतोष सापते यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रामचंद्र कणसे यांनी केले.