सातारा : राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार, करिअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशीविदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग मिळवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी क्रीडा संस्थांनी सोमवार, दि. 7 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळेकर यांनी केले आहे. ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत निवडण्यात आलेल्या मैदानी, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शूटिंग, सेलिंग, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये राज्यात उत्तम खेळाडू निर्माण करणार्या खाजगी अकादमींना अर्थसहाय्य देऊन, या संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करायच्या दृष्टीने संबंधित अकादमीतील खेळाडू, मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, त्यांचा स्तर, साहित्य व क्रीडा अकादमींच्या कामगिरीचे गुणांकन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 35 ते 50 गुण मिळवण्यार्या संस्था ‘क’ वर्ग, 51 ते 75 गुण मिळवणार्या संस्था ‘ब’ वर्ग आणि 76 ते 100 गुण मिळवणार्या संस्था ‘अ’ वर्ग, असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकादमी, क्रीडा संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज सोमवार, दि. 7 पर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत.