Satara : सोनचिरैया महोत्सवामुळे बचत गटांच्या पंखांना बळ

सातारा : महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा पालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. पाच वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सोनचिरैया महोत्सवामुळे’ बचत गटांच्या पंखांना अर्थबळ प्राप्त होत आहे. महिला उद्योजकांनी शासनाच्या अशा योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असे आवाहन सातारा पालिकेच्या लेखाधिकारी अमृता परदेशी यांनी केले.
साताऱ्यातील शाहू कलामंदिरात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्यावतीने दि. १० ते १२ जानेवारी या कालावधीत ‘सोनचिरैया संक्रांत महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार ऋतुजा कोडगुले, शहर अभियान व्यवस्थापक कीर्ती साळुंखे, गीतांजली यादव, समुदाय संघटक आरती जोशी, माजी नगरसेविका सविता फाळके आदी उपस्थित होते.
या महोत्सवात एकूण ८० स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर संक्रांतीसाठी लागणारे तीळगूळ, संक्रांतवाण वाटपासाठी आवश्यक वस्तू, गुळाच्या पोळ्या, शोभेच्या वस्तू, वस्त्र, गोधड्या, आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने, हँडमेड व इमिटेशन ज्वेलरी, मातीची भांडी, विविध मसाले आदी वस्तूंचा समावेश आहे.
स्टॉलसाठी उभारण्यात आलेला मंडप, आकर्षक मांडणी, उत्तम वीजव्यवस्था आदी व्यवस्थेमुळे या महोत्सवाला वेगळीच झळाली आली आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळा, संस्था तसेच सातारकरांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन भरभरून खरेदी केली.





