Satara : महाबळेश्वरच्या पायथ्याशी होणार सोळशी धरण

फलटण : वाई, फलटण, माण तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी येथे नवीन धरण बांधण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सोळशी धरण असे या धरणाचे नाव असून या नवीन प्रकल्पामुळे कोयना धरणातील पाणी कमी झाल्यावर नदीकाठावरील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. माण, फलटण या दुष्काळी तालुक्यांसाठी हे धरण वरदान ठरणार आहे. तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटणार सोळशी धरण बांधणीसाठी मंत्रालयात नुकतील आढावा बैठक घेण्यात आली.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला मंत्री मकरंद पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील उपस्थित होते. या बैठकीत सातारा जिल्ह्याला नवे धरण मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नवीन धरण होणार ही बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी असून, या धरणामुळे मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल आणि आपोआपच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.
माण, फलटण आणि वाई हे तिन्ही तालुके मुख्यतः कोरडवाहू असून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. नवीन धरण तयार झाल्यानंतर हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
एकूणच सोळशी धरणामुळे या भागातील शेती बागायती होण्यास मदत होणार आहे. फक्त शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याची कमतरता, पशुधनासाठी पाण्याचा अभाव, यासारख्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.





