Satara: जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील. कारण विकास कामांना बघून लोक मत देतात. विरोधक पालिकेत यायला लागले तर पत्रकारांना सुद्धा टोल द्यावा लागेल, अशी खिल्ली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी उडवत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर टीका केली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील यांच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा नरेंद्र पाटील हेच आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला. येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये नगरपालिका निवडणुकीत मतदानानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी हाताचे बोट उंचावत मतदान केल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘सातार्यात अपक्ष बंडखोरांची उमेदवारी म्हणजे प्रभागाचे नुकसान करण्याचा प्रकार आहे. प्रभागात मनोमिलनाचे उमेदवार पक्षाचे प्रतिनिधी आहेत. पक्षाच्या माध्यमातून सातारा शहरासाठी विविध विकास कामे होणार आहेत. अपक्षांना सातारकर साथ देणार नाहीत. अपक्ष प्रभागासाठी निधी आणू शकत नाहीत. त्यामुळे लोकांच्या हिताचे नुकसान होते. आमची पक्षीय चौकट ठरली होती. अपक्षांना यापूर्वीही बंडखोरी रोखण्याचे आवाहन केले होते. त्यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.’’ सातारा, कराड, पाचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, वाई, रहिमतपूर या पालिकांमध्ये भाजपचे सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील. आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये भाजपने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्वत्र प्रचार यात्रा, कोपरा सभा, जाहीर सभा, गाठीभेटी याविषयी मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले होते. वातावरण निर्मिती करून मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपच्या उमेदवारांनी यश मिळवले आहे. त्यामुळे निश्चितच सर्व उमेदवारांना नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुवर्णाताई पाटील यांच्या बंडखोरीविषयी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘पक्षाने सुवर्णाताईंना राज्यस्तरावरची ताकद दिली होती, मग त्यांनी पक्ष का सोडला ? त्यांना खुर्ची आणि सत्ता ही महत्त्वाची वाटत होती. त्यांना यापुढे सुद्धा संधी मिळू शकली असती. माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील त्यांच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहेत.’’ पाटील उद्या जर नगरपालिकेत येऊन बसायला लागले तर सातारा पालिकेत पत्रकारांना सुद्धा टोल द्यावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली. जिल्ह्यात भाजपला विरोधकांचे आव्हान नाही. उमेदवारांचे फार- फार तर काही ठिकाणी मताधिक्य कमी होऊ शकते. सातार्यात मनोमिलनाचे उमेदवार घवघवीत यश मिळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.