सातारा : लोकांची कामे गतीने होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

पुरुषोत्तम जाधव; १,२११ नागरिकांना सरकारच्या विविध सेवा व योजनांचा लाभ
खंडाळा – विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात आले.
त्या अभियानांतर्गत एका दिवसात खंडाळा तालुक्यातील तब्बल १,२११ नागरिकांना सरकारच्या विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाला. लोकांची कामे गतीने होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले.
उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यालय प्रमुखांसमवेत कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्या दृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्ज भरून घेतले, यासाठी विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता.
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत समिती, वनविभाग, विजवितरण, खंडाळा नगरपंचायत आदी विभागांनी सहभाग घेतला होता. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचला आणि त्यांना योजनांचा लाभ मिळाला याचे समाधान नागरिकांमध्ये बघायला मिळाले . सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले यापुढेही अशाच मोहिमा राबवून सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.
एकुण १२११ लाभार्थ्यांना उपक्रमाचा लाभ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी आणि तालुक्यातील लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.





