सातारा – सिलेंडरच्या स्फोटामध्ये कराडमध्ये सात जखमी

कराड – येथील बुधवार पेठेतील महात्मा फुले नगर येथे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्वयंपाकाचा सिंलेडर लिकेज होऊन झालेल्या गॅस गळतीने झालेल्या स्फोटात सात जण जखमी झाले.
अनिता सुनील मोरे, उमेश आबा दुबळे, संगीता सदाशिव भोसले, अमोल सदाशिव भोसले, किरण राजू बडेकर, मालन राजाराम भोसले व मालन दत्तू मोरे हे या घटनत जखमी झाले. तेथील नागरिकांनी त्वरीत मदत कार्य राबवून जखमींना कृष्णा रुग्णालयात हलवले. याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील प्रभात टॉकीजजवळ असलेल्या महात्मा फुले नगर येथे बुधवारी एका पत्र्याच्या घरात गॅस गळती झाली. त्यानंतर काही वेळातच येथे स्फोट झाला. या स्फोटात घराची भिंत पडून भांडी अस्ताव्यस्त विखुरली गेली.
तसेच घरावरील पत्रे निखळून पडले. घटनास्थळासह आजूबाजूच्या घरांतील सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलासह पोलिसही घटनास्थळी पोचल्याने तेथे मदतकार्य राबविण्याचे काम सुरू करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हा स्फोट नेमका गॅस गळतीमुळेच झाला की अन्य कारणामुळे याचा पोलीस शोध घेत आहेत. गुरुवारी दुपारी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.





