सातारा – संग्रहालय परिसरातील टपर्या हटवण्यास विक्रेत्यांचा नकार

सातारा – छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ऐतिहासिक वाघनख्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, तेथील विक्रेत्यांनी अतिक्रमणे हटवण्यास नकार दिला आहे. हॉकर्स संघटनेने या कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे. या वादात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे ससेहोलपट होत आहे. ही अडथळ्यांची शर्यत हा विभाग कशी पार करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सातार्यातील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे. पालिकेने राजवाडा परिसरातील फळविक्रेत्यांचे हातगाडे हटवून राजवाड्यासमोरील भाग मोकळा केला आहे. या कारवाईचे कौतुक होत आहे. छत्रपती शिवरायांनी अफजलखान वधासाठी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे छत्रपती शिवाजी संग्रहालयात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी संग्रहालयाचा परिसरातील अतिक्रमणे हटवून तो सुशोभित करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. त्यानुसार पालिकेने अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली असता, या कारवाईस काही संघटनांकडून वारंवार विरोध होत आहे.
पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास या परिसरात गेल्यानंतर काही विक्रेत्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढायला सुरुवात केली. त्याशिवाय काही बंद टपर्या पदपथावरून उचलण्यात आल्या. मात्र, थोड्या वेळाने असता हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी तेथे आल्यावर कारवाईला विरोध सुरू झाला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला हात हलवत माघारी परतावे लागले. या पथकाला कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाला नाही.
छत्रपती शिवाजी संग्रहालय ते प्रशासकीय भवन या दरम्यानच्या मार्गावर वडाप आणि इतर वाहनांच्या पार्किंगमुळे कायमच गर्दी असते. त्याचबरोबर संग्रहालयाच्या भिंतीलागतच्या चहा आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉल्समुळे गर्दीत भर पडते. लोकशाही दिनामध्ये सातत्याने तक्रारी होऊनही, येथील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई झाली नव्हती. आता ऐतिहासिक वाघनख्या संग्रहालयात येणार असल्याने हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र, हॉकर्स संघटनेच्या काही पदाधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे कारवाईला विरोध होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेला ही कारवाई करावीच लागणार आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे काढण्यात येतील, असे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी सांगितले.





