सातारा : महाराष्ट्र स्कूटर्सची जागा सातारकरांना टिकवता आली नाही आणि आता ते टेस्लाला जागा देणार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहने बनवणारी ‘टेस्ला’ कंपनी आपल्या सीकेडी (कम्प्लीटली नॉक्ड डाऊन) असेंब्ली प्लँटसाठी सातारा जिल्ह्यात जागेचा शोध घेत असल्याचे वृत्त आहे. सातारा औद्योगिक वसाहतीत पूर्वी महाराष्ट्र स्कूटर्स ही मोठी कंपनी होती. सुमारे वीस वर्षांपूरीव कंपनीचे उत्पादन बंद झाले. आणि आता या महाराट्र स्कूटर्स कंपनीची जागाही खासगी विकसकाला बहाल करण्यात आली आहे. कंपनीची जागा टिकवता आली नाही आणि आता ‘टेस्ला’ येत आहे तर तिला सातारा परिसरात जागा मिळते की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सातारा औद्योगिक वसाहतीत मोठा उद्योग नाही. औद्योगिक वसाहतीत किती उद्योग आहेत आणि किती जागा उद्योगेतर कामासाठी उपयोगात आणल्या गेल्या आहेत, याचा हिशोब एकदा तरी करायला हवा. महाराष्ट्र स्कूटर्स, अरिस्टोक्रॅट यांसारख्या काही मोठ्या कंपन्या गेल्यानंतर स्थानिक कूपर उद्योग समूहासारखा एखादा मोठा उद्योग आहे, म्हणून सातारा औद्योगिक वसाहतीत थोडा तरी जीव आहे. इतक्या वर्षात औद्योगिक विकासाला योग्य दिशेने गती मिळाली नाही. पण आता राज्यातील मंत्रिमंडळात जिल्ह्याचे चार कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेचे आठ, विधानपरिषदेचे तीन सदस्य, लोकसभेचे दोन व राज्यसभेचे एक असे तीन खासदार आहेत. सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे साहजिकच राज्यात सत्तारुढ महायुतीकडे या दोघांसह सर्वांनी या औद्योगिक विकासासाठी शब्द टाकला तर सातारा औद्योगिक वसाहतीचे चित्र बदलू शकते. टेस्ला कंपनी सातारा जिल्ह्यात येणार आहे. म्हणजे ती सातारा, कराड, वाई, शिरवळ, फलटण, म्हसवड अशा कुठल्याही औद्योगिक वाहतीमध्ये येऊ शकते. जिल्ह्याच्या ठिकाणची वसाहत म्हणून सातारा औद्योगिक वसाहतीचे महत्त्व आहे. महामार्ग, रेल्वे, वीज, पाणी अशा साधारणतः उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे सातारा परिसरात ‘टेस्ला’ आली तर या औद्योगिक वसाहतीच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. बजाज, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या भागीदारीतून महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरु होती. शासनाचा सहभाग असला तरी बजाजचे शेअर्स अधिक होते. कंपनीतून सुमारे दीड हजार कामगारांमार्फत प्रिया स्कूटरचे उत्पादन साधारणतः २००७ पर्यंत सुरु होते. उत्पादन बंद होताना कामगारांना व्हीआरएस दऊन निवृत्ती देण्यात आली. आणि गेल्या वर्षी कंपनी पूर्णपणे बंद झाली. कंपनी बंद पडू नये म्हणून त्यावेळी काही पाठपुरावा झाला पण त्यात यश आले नाही. आता या कंपनीची सुमारे ४८ एकर जागाही गेली असून तिथे छोट प्लॉटस पाडले जाण्याची शक्यता आहे. औद्योगिक कारणासाठी विकसित केलेली जागा महामंडळाने परत घेऊन ती मोठ्या उद्योगाला द्यावी, अशी मागणी जोर धरत असतानाच ‘टेस्ला’ची बातमी येऊन धडकली आहे. त्यामुळे आता तरी पाठपुरावा होऊन ही जागा वाचविण्याची संधी आली आहे आणि आवश्यकताही आहे. आता संधी सोडता कामा नये… जिल्ह्यातील चार कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, इतर सर्व आमदार अशी मोठी राजकीय ताकद जिल्ह्यात असताना आता ‘टेस्ला’सह इतर मोठे उद्योग यावेत यासाठी आलेली ही नामी संधी आहे. पुणे व कोल्हापूर या लगतच्या शहरांच्या आसपास मोठ्या उद्योगांसाठी जागा मिळणे अवघड असल्याने सातारा जिल्ह्यात उद्योग येणासाठी निश्चितच संधी आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी शहराजवळ आयटी हबसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उदयनराजे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधींसह पाठपुरावा केला तर जिल्ह्याचा रखडलेल्या विकासाला गती मिळू शकते. आता संधी सोडू नये, अशी अपेक्षाच जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.