सातारा : शैक्षणिक वर्षाची सुरुवात उद्या, दि. 16 रोजी होत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या दोन हजार 742 शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमांद्वारे चिमुकल्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये नव्याने प्रवेशित होणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढवण्यासाठी आणि शालेय गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शिक्षक, व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळांमध्ये नव्याने प्रवेशित होणार्या बालकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. त्यानंतर शाळांच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्याचे फुले देऊन, स्वागत करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोफत दोन गणवेश, एक जोडी बूट, दोन पायमोजे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत देण्यात येणार आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ सदस्य यांच्याकडूनही नवागतांचे स्वागत करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी किमान एका शाळेत उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेतील जेवणात गोड पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे उत्साही आणि जल्लोषी वातावरण स्वागत करण्यात येणार असून, याबाबत शाळा स्तरावर नियोजन करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहावेत, यासाठी विविध स्पर्धा परीक्षा घेऊन, त्यांना तयार करण्यात येत आहे. ‘स्मार्ट स्कूल’ ही संकल्पना प्रभावीरित्या राबवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत असल्याने, पालक व विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वाढताना दिसत आहे. शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येत आहे. – याशनी नागराजन (मुख्य कार्यकारी अधिकारी)