Satara : व्याघ्र प्रकल्पाच्या विळख्यातील सातर बनतेय विकासाचे ‘रोल मॉडेल’

पाटण : तालुक्याच्या दक्षिणेला जिल्ह्याच्या अगदी सीमेवर व्याघ्र प्रकल्पाच्या विळख्यात सापडलेले सातर अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिले. आता मात्र जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे गावात अनेक विकास कामे सुरू असून सातर गाव यापुढे काही दिवसांत विकासाचे रोल मॉडेल बनेल, असा विश्वास येथील ग्रामस्थांना वाटत आहे. सातर गावावर मंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष लक्ष दिल्याने हे सर्व शक्य होत आहे.
पाटण तालुक्यात आजही काही गावात एखादी व्यक्ती आजारी पडली तरी तिला कावड करून किंवा डोलीतून दवाखान्यात न्यावे लागते. सातर गावाची तीच गत आहे. गवताने झाकलेली घरे पाहून सातर गाव कित्येक वर्षे असुविधेचा सामना करत आले असेल याची प्रचिती येते. परंतु, आज या गावात विकासकामे सुरू असलेली पाहून लोकांचा उर आनंदाने भरून आला आहे. आमचे आयुष्य असेच वाया गेले. पायवाटेने चालून चालून आमची हयात गेली. आता यापुढे आमच्या मुलाबाळांना तरी जगाच्या संपर्कात यायची संधी मिळेल यातच समाधान आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सातर स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले गाव असून यामध्ये बौद्ध वस्ती, लखान वस्ती, महामुलेवाडी, सुतार वस्ती, धनगरवाडी अशा वाड्या आहेत. वांग-मराठवाडी धरणापासून अगदी जवळ असलेल्या सातर गावाला सध्या रस्ता मिळाला आहे. त्याचे खडीकरण, डांबरीकरण सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होत आहे. नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत उभी राहिली. गावातील आणि वाड्यावस्त्यातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. हे सर्व शक्य झाले ते गावाच्या एकजुटीमुळे आणि त्याचे फळ म्हणून या भागाचे आमदार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातर गावात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विविध कामे दिली आहेत .
इंटरनेटच्या युगामध्येही
सातर वावरते अंधारातच
सध्या जग इंटरनेटच्या युगात जग वावरत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. फाइव्ह जी, इंटरनेटची सुविधा गतिमान झाली असताना सातर गावात साधी पिठाची गिरणी चालू शकत नाही. कारण गावात अजून टू फेज वीज पुरवठा आहे. बिघाडामुळे सतत वीज खंडीत होते. गाव जंगलात असल्यामुळे विजेच्या अंधुक प्रकाशाचा अडथळा येतो. जंगलातील अंधारात वावरते. ग्रामस्थांनी ही बाब मंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता गावात थ्री फेज यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले आहे.
सातर गाव अनेक वर्ष विकासापासून वंचित होते. मात्र गेल्या काही वर्षापासून गावाच्या विकासाला सुरुवात झाली आहे. जंगलात वसलेले आमचं गाव आता जगाच्या प्रवाहात येत आहे. याचे सर्व श्रेय आमचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांना जाते. कारण त्यांनी मनावर घेतल्यामुळे गावात सध्या कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत.
– नंदाताई साळुंखे (सरपंच, सातर)





