उंब्रज : सह्याद्रि साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे आता बदलाच्या दिशेने वाहू लागले आहे. ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली आहे. विद्यमान चेअरमननी माफीनामे लिहून घेतल्याचे सभासद विसरलेले नाहीत. वारसनोंदी जाणीवपूर्वक टाळल्या. कामगारांचा खासगी कामांसाठी गैरवापर केला. गेल्या 30-40 वर्षांत कारखान्यामध्ये 70 ते 80 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार मनोज घोरपडे यांनी केला. सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ तळबीड ता. कराड येथे ते बोलत होते. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल बाजीराव मोहीते, सह्याद्रि कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, गामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते, माजी उपसरपंच दादासाहेब मोहिते, अॅड. शशिकांत मोहिते, सुनील आप्पासाहेब मोहिते, माणिक पाडळे, सुभाष गायकवाड, विकास यादव, बाबा माने, विलास गायकवाड, संजय चव्हाण, सयाजीराव मोहिते, सुजय मोहिते, शालिनीताई गुणवंत, महादेव गायकवाड, सुधाकर तुपे, प्रकाश मोहिते, रमेश मोहिते, सिद्धार्थ भोसले, संजय घोरपडे, संपतराव जाधव, अशोकराव चव्हाण, भास्कर पवार, महेश जाधव आणि सभासद उपस्थित होते. आमदार घोरपडे म्हणाले, मी अपघाताने आमदार झाल्याची टीका केली जाते; परंतु कराड उत्तरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी साडेतीन महिन्यांत काम केले. तुम्ही 24 वर्षांत काय केले?सह्याद्रि हा राज्यात नावाजलेला कारखाना होता; परंतु कारखाना वाचवायला पाहिजे, असे म्हणायची वेळ तुमच्यावरच आली आहे. मात्र, कारखाना अडचणीत कोणी आणला? तुम्ही सत्तेचा अमर्याद वापर करून स्वतःचे घर भरले. कारखान्यात भ्रष्टाचार झाला असून, विद्यमान चेअरमननी 40 वर्षांत 70 ते 80 कोटी रुपय स्वतःच्या कुटुंबावर उडवले. ऊस जाण्याच्या बाबतीत एकही शेतकरी सभासद समाधानी नाही. फक्त चेअरमन व त्यांचे कुटुंब समाधानी आहे. सगळ्यांची लूट करून, राजकारणात पैसा वापरला. विधानसभा निवडणुकीत जनतेने यांना दाखवून दिले. आता कारखान्यात बदल करायचाय, असे सभासदांचे म्हणणे आहे. पाणी संस्थेच्या माध्यमातून सभासदांवर दबाव टाकला जातो. मात्र, पाणी योजनांसाठी तुमचे योगदान काय? दरवर्षी इन्स्पेक्शनच्या नावाखाली दोन लाख रुपये फी घेता. मात्र, या संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा विचार का केला नाही? पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजनमधून या योजनांना 16 तास वीज दिली. मात्र, त्यांच्याकडे लोक गेले असता, 70-80 लाख रुपये घेऊन या, असे यांनी सांगितले. आपण येत्या काळात शेतकर्यांना 24 तास वीज देण्याचे नियोजन करू. कारखान्यात सत्तांतर झाल्यावर टग्यांचा बंदोबस्त केला जाईल. तुम्ही शेतकर्यांच्या पोराला आमदार केले. आता कारखान्यात परिवर्तन करा. हा कारखाना राज्यात नव्हे, तर देशात अग्रगण्य बनवू. आपण कारखान्याचे मालक आहोत, अशी वागणूक विद्यमान चेअरमननी शेतकरी सभासदांना दिली; परंतु खरे मालक कोण आहेत, हे सभासदच दाखवून देतील आहे. सभासदांना हा कारखाना आपला वाटत नसून, तो चेअरमन यांचा वाटतो, इतकी दहशत आहे. मात्र, त्यांना जसे माजी आमदार केले, तसे या निवडणुकीत माजी चेअरमन करायचे आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम साडेतीन वर्षांत पूर्ण झाले नाही. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. वारसनोंदी प्रलंबित आहेत. सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी आणि आपल्या बगलबच्चांना बरोबर घेऊन, ही संस्था कायम ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी वारसनोंदी केल्या नाहीत; परंतु आपण हे चित्र महिन्याभरात बदल. साडेआठ हजार सभासदांच्या वारसनोंदी करून शेअर्स ट्रान्सफर करून देण्याचे आश्वासन आमदार घोरपडे यांनी दिले.