सातारा – करवसुलीतून गावकारभाऱ्यांना ग्रामपंचायत चालवणे जिकिरीचे होते. कारण ग्रामपंचायतीची वसुली 50 टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी वेगवेगळ्या योजनांच्या विस्तारीकरणासाठी सतत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहयला हवे. तरच निधीसंदर्भात मार्गदर्शन होऊ शकते. गावपातळीवर सत्ताधारी व विरोधक यांनी एकत्र आल्यास गावांचा शाश्वत विकास शक्य आहे. विरोधासाठी विरोधाची प्रवृत्ती सोडून गावाच्या विकासासाठी विरोधकांनी सहकार्याचा हात पुढे करणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष व धामणेरचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माजी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी केले. दै. प्रभातच्यावतीने आयोजित सरपंच पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. क्षीरसागर बोलत होते. ते म्हणाले, ग्रामपातळीवर विकास साधण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. मात्र, रचनात्मक विकास आणि पायाभूत सुविधा यांच्या विस्तारीकरणासाठी चळवळ सुरू झाली पाहिजे. एका चळवळीचा फायदा दुसऱ्या कामाला होत असतो. सरपंच म्हणून कारभाऱ्याला पाच वर्षाचा कालावधी मिळाला तर कामाला परिणाम देणे शक्य होते. मात्र, राजकीय स्पर्धेतून सरपंच कालावधी एक ते दोन वर्षाचा असेल तर कामाचा ठसा उमटवता येणार नाही. गेल्या तीन दशकांमध्ये आपण साडेसहाशे गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या, असे सांगून क्षीरसागर म्हणाले, स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी तालुका पातळीवर दहा लाख व जिल्हा पातळीवर 40 लाख रुपयांची बक्षीस योजना आहे. मात्र, या निधीसाठी सरपंच स्वयंस्फूर्तीने पुढे येत नाहीत. सरपंचांना कामासाठी कोणीही स्पर्धक नाही. सरपंचांनी स्वतःहून अशा विविध योजनांमध्ये भाग घ्यायला हवा. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निधींचे वेगळे कोणते मार्ग निवडता येतील याची माहिती घ्यायला हवी व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करून उत्पन्नाचे वेगळे स्त्रोत तयार करायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.