Satara : जिल्ह्यातील निवृत्त नौसैनिक युद्धभूमीवर जाण्यास तयार

सातारा : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी होत आहे. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवृत्त नौसैनिकांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना मंगळवारी निवेदन देऊन, देशाच्या संरक्षणासाठी आम्ही निवृत नौसैनिक देशाच्या सीमेवर जाण्यास तयार असल्याचे या नौसैनिकांनी सांगितले.
या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे. सातार्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते ते दिवंगत कर्नल संतोष महाडिक यांच्यापर्यंतचा समृद्ध लष्करी वारसा आहे. जिल्ह्यातील सैनिकांनी पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्व युद्धांमध्ये भाग घेतला आहे. कदाचित म्हणूनच सैनिकांच्या या शहरात पहिली सैनिक शाळा स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक अधिकारी, सैनिक, नौसैनिक आणि वायूसैनिकांना शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
भारत सरकारने युद्ध किंवा युद्धासारख्या कारवाईने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला, तर भारतीय नौदलाला कोणत्याही प्रकारे मदत करण्याची आमची तयारी आहे. जिल्ह्यात 500 हून अधिक माजी नौसैनिक आहेत. आम्हाला खात्री आहे की, भारतीय नौदलाला सेवांची आवश्यकता भासल्यास देशाच्या इतर भागातील आमचे बांधवदेखील मदत करण्यास उत्सुक आहेत. आम्हाला वयामुळे काही मर्यादा नक्की असतील; परंतु आमचा नौदलातील सेवेचा अनुभव युद्धप्रसंगी नक्कीच उपयोगी पडेल.
या निवेदनावर शंकर माळवदे, अश्फाक पटेल, दिलीप बर्गे, उमेश साळुंखे, राजेंद्र निकम, संतोष भोसले, वसंतराव नलावडे, जीवन शिंगाडे, अशोक साळुंखे, सूर्यकांत पडवळ आदींच्या सह्या आहेत.





