सातारा : ज्ञानविकास मंडळ प्रवचनमालेला प्रतिसाद

अध्यात्मिक व जीवनविषयक विषयमांडणीने झाले प्रबोधन
सातारा – येथील ज्ञानविकास मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय प्रवचनमालेस सातारकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. सिव्हिल हॉस्पिटलसमोरील गणपती मंदिरात झालेल्या या प्रवचन मालेत ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन नेने, प्रवचनकार सौ. उर्मिला आपटे व नंदकुमार देशपांडे यांनी अध्यात्मिक व मानवी जीवनविषयक केलेल्या वैचारिक मांडणीतून श्रोत्यांचे प्रबोधन झाले.
प्रवचन मालेमध्ये ज्ञानविकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांनी प्रास्ताविक केले. गौतम भोसले आणि श्याम चितळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वासुदेव दोशी यांनी आभार मानले. प्रवचनमालेसाठी भगवद्गीतेचे अभ्यासक म. वि. कोल्हटकर, आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत देव, कवयित्री प्रमिला कुलकर्णी, सुरेखा कुलकर्णी, श्रीमती कमलताई पाटील आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक श्रीराम नानल हे उपस्थित होते. त्यांनी ज्ञानविकास मंडळाच्या कार्याचा गौरव केला.
या प्रवचन मालेमध्ये पहिल्या दिवशी वाईचे मधुसूदन नेने यांचे प्रवचन झाले. त्यांचा विषय होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता. ते म्हणाले, भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी त्या काळामध्ये लोकसभेमध्ये तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा उल्लेख केला होता आणि त्यांनी ग्रामगीतेचा प्रोजेक्ट म्हणून उल्लेख केला. सर्व खासदारांनी उभे राहून या विचारानंतर तुकडोजी महाराजांना मानवंदना दिली होती.
तुकडोजी महाराज म्हणायचे, प्रत्येक माणसानं आपलं आपलं काम चोख बजावले पाहिजे. माया, ममता, शक्ती, युक्ती, प्रिती अशा प्रकारचे स्त्रीलिंगी शब्द हे स्त्रीच्याच ठाई असतात. स्त्रीला कमी लेखता कामा नये. स्त्री ही समाजाचे भूषण आहे. तिला योग्य तो मान दिला पाहिजे. त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षी ग्रामगीता लिहिली. त्यात त्यांनी असं म्हटलं, खेड्यांचा म्हणजेच ग्रामउद्धार जर होईल तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल.
प्रवचन मालेत दुसऱ्या दिवशी सौ उर्मिला आपटे सातारा यांचे शेवटचा दिवस गोड व्हावा’ या विषयावर प्रवचन झाले. त्या म्हणाल्या, यश आणि अपयश हे प्रत्येक माणसाच्या प्रयत्नावर अवलंबून असते. काशीची गंगा नाथांनी गाढवाला पाजली त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की एवढी पवित्र गंगा गाढवाला काय पाजताय. तेव्हा ते म्हणाले मला या गाढवाचा आत्मा दिसतोय. त्या आत्म्याची तृप्ती होणे महत्त्वाचे आहे. सगळे संत असं म्हणतात की मी हे करत नाही. माझ्या हातून हे घडतं.
प्रवचन मालेचा समारोप प्रवचनकार नंदकुमार देशपांडे यांच्या प्रवचनाने झाला. त्यांनी एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीची या विषयावर रसाळ विवेचन केले. ते म्हणाले, वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेवर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भाष्य केले. त्यांनी कर्मकांडाला, जातीपातीला विरोध केला.
परमेश्वराला फक्त भक्ती आवडते असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक संतांनी ज्ञानदेवांना वंदन केले आहे. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने चित्त शुद्ध होते. टिळक, गांधी, सावरकर यांचा विचार हा गीतेवर आधारित होता. खरा सदगुरु म्हणजे जे स्वतःला मोठेपणा न घेता दुसऱ्याला मोठेपणा देतात. ज्ञानदेवांनी आपले गुरु निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरीमध्ये 101 नावांनी संबोधले आहे. वैराग्य हे सदगुरु कृपेने प्राप्त होते.





