Satara: शाळांमध्ये आठवड्यातून एकदा वाचन उपक्रम राबवावा

सातारा : सततच्या वाचनामुळे बुध्दीचा व्यायाम होत असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवड्यात एकदा एकत्र येऊन वाचनाचा उपक्रम राबवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडमधील प्रितीसंगमावरील अभिवादनानंतर टाऊन हॉलमधील कार्यक्रमात नागराजन बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, प्रज्ञा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, कार्यकारी अभियंता अमर नलवडे, संजय लाड, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी, उपशिक्षणाधिकारी रवीद्र खंदारे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, प्रा. श्रीधर साळुंखे आदी उपस्थित होते.
एखादया देशाच्या महानतेचे गमक काय आहे, असा प्रश्न विचारून याशनी नागराजन यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास असून शाळेत ग्रंथालयांची उभारणी करावी. वाचनाची सवय वाढल्यास विद्यार्थ्यांचे विचार विकसित होतील. रोबोटिक, सेमी इंग्लिश, इंग्लिश स्पिकिंग डे सारखे उपक्रम पुढील काळात राबवण्यात येणार आहेत, असे नागराजन यांनी स्पष्ट केले.
अर्चना वाघमळे म्हणाल्या, जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट स्कूल उपक्रमामुळे झेडपी शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मुलांच्या एकाग्रतेसाठी २५ मिनिटे सलग वाचन, 4 मिनिटे विश्रांती, २५ मिनिटे पुन्हा वाचन हा उपक्रम राबवावा. शाळांमधून योगाचेही शिक्षण देण्यात यावे.
कै. यशवंतराव चव्हाण यांची महती प्रमुख वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे यांनी विशद केली. यशवंतराव चव्हाण यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी व्याख्यानात आढावा घेतला. कै. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा (वैयक्तिक व सांघिक प्रकार), विद्यार्थी दिन (७ नोव्हेंबर २०२४) निमित्ताने घेतलेल्या स्पर्धांमधील विजेते, जिल्हास्तर परसबाग स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
परसबाग स्पर्धेत भोळेवाडी (ता. कराड), लिंबाचीवाडी (ता. सातारा), गारवडी (ता. खटाव) या अनुक्रमे पहिल्या तीन शाळांना सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण यांची रांगोळी रेखाटणारे विजय शिंगण यांचा सन्मान करण्यात आला. शबनम मुजावर यांनी प्रास्ताविकात शिक्षण विभागाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या हरपळवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत गायले. बिपीन मोरे यांनी आभार मानले.





