Satara: देशाची राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झालेल्या एआय समीटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत, देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. याचा सातारा शहर शिवसेना शिंदे गटाच्यावतीने निषेध करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडो मारो आंदोलन करत दहन केले. दिल्लीतील आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली. पोवई नाका येथील शिवतीर्थासमोर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून, दहन करण्यात आले. यावेळी शहर संघटक अमोल इंगोले म्हणाले , नवी दिल्लीतील एआय समीटमध्ये जगभरातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान आपल्या देशाची बाजू मांडत असताना, राहुल गांधी यांच्या काही समर्थकांनी तेथे अर्धनग्न आंदोलन केले. ही बाब काँग्रेससाठीसुद्धा लज्जास्पद आणि निंदनीय आहे. देशाची प्रतिमा जगभरात मलीन होईल, असे कृत्य केल्याबद्दल या आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. यावेळी मीनाक्षी मोरे, दीपक चव्हाण, किरण कांबळे, उपशहरप्रमुख अजिंक्य राजपूत, प्रसन्न शिंदे, उपजिल्हाप्रमुख संगीता पवार, तालुकाप्रमुख विद्या बर्गे, विमल सुपनेकर, रंजना पवार, राहुल खुडे उपस्थित होते.