Satara : लेखक होण्यासाठी निरीक्षण शक्ती महत्त्वाची

पुसेगाव : एखाद्या विषयावर लिखाण करण्यासाठी किंवा कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, कविता, नाटके, पटकथा, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य प्रकारातील लेखन करण्यासाठी लेखकाची निरीक्षण शक्ती महत्त्वाची असते, असे मत प्रा. डॉ. एन. डी. लोखंडे यांनी व्यक्त केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत स्थानिक लेखकाशी परिसंवाद व नव साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ‘पुस्तक लेखन कौशल्य आणि प्रक्रिया’ विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. संजय क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले, प्रा. एल. के. पवार, प्रा. पी. व्ही. गायकवाड, प्रा. एस. आर. धोंगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. लोखंडे म्हणाले, ‘लेखकाला एखाद्या गोष्टींची काल्पनिक प्रतिमासृष्टी उभी करण्यासाठी प्रतिभावंत लेखक आपल्या बुद्धीच्या कौशल्याने भाषेचा वापर करतो. समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये लेखकाच्या लेखनाचा महत्त्वाचा वाटा असतो.
साहित्य निर्मिती करताना लेखकाला आपल्या आवडीचे विषय आहेत त्याची प्रथम निवड करावी लागते. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक असते. ज्या भाषेत लेखन करावयाचे आहेत त्या भाषेचा प्रमाण भाषेचा, बोलीभाषेचा अभ्यास करावा लागतो इत्यादी साहित्य निर्मितीसाठी आवश्यक घटकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा. डॉ. संजय क्षीरसागर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी वाचन करणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये वाचन संस्कृतीचे व ग्रंथालयाचे महत्त्व असते.
डॉ. आर. पी. भोसले म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी वाचन उपक्रमात सहभागी व्हावे व आपला शैक्षणिक विकास घडवून आणावा. कारण उत्तम लेखक होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. प्रा. एल. के. पवार यांनी प्रास्ताविक करुन लेखक परिचय करुन दिला. प्रा. एस. आर. धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. व्ही. गायकवाड यांनी आभार मानले.





