Satara: झापूक झुपुक वाजतंय गं…गाणं अन् राजकीय चर्चा; शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट

सातारा – आमदार शिवेेंद्रसिंहराजे यांच्या गाडीमध्ये उदयनराजे बसले. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘झापूक झुपुक वाजतंय गं…’ हे गाणे लावून भेटीत रंग भरले. दोघांनीही या गाण्यावर भेटीचा मनमुराद आनंद लुटत राजकारणावर जोरदार चर्चा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या बंधूंची जलमंदिर येथे तब्बल आठ वर्षांनंतर भेटगाठ झाली. मनोमिलन तुटल्यापासून ते पुन्हा राजकीय मनोमिलन झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे जलमंदिर वर प्रथमच गेले होते. एकमेकांच्या प्रकृतीची चर्चा झाल्यानंतर राजकारणावर ही चर्चा करण्यात आली मात्र या घटनेचा तपशील समजू शकला नाही.
साताऱ्याचे राजकारण उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती सातत्याने फिरत राहिले आहे. राजघराण्यातील या बंधूमध्ये कधी राजकीय विरोध, तर कधी राजकीय मनोमिलनही पाहण्यास मिळाले आहे. आठ वर्षापूर्वी सातारा पालिकेत मनोमिलन केल्यानंतर दोन कुटुंबातील राजकीय वैमनस्य कमी झाले. मात्र, मनोमिलन तुटल्यानंतर पुन्हा हे वैमनस्य उफाळून आले होते.
आता दोघेही भाजपमध्ये असल्याने पक्षीय पातळीवर दोघांमध्ये राजकीय मनोमिलन घडून आले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दमदार सोबत दिली होती. त्यापूर्वी सातारा जिल्हा सहकारी बँकेत संचालक होण्यासाठीही उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंनी मदत केली होती. गत काही महिन्यात उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या सुरुची या निवासस्थानी तिनदा भेट दिली होती. जिल्हा बँक निवडणूक, लोकसभा निवडणूक व वाढदिवस या तीन वेळी उदयनराजे सुरुची निवासस्थानी गेले होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे मात्र मनोमिलन तुटल्यापासून जलमंदिर येथे गेले नव्हते. तब्बल आठ वर्षानंतर शुक्रवारी रात्री शिवेंद्रसिंहराजे जलमंदिर येथे गेले. यावेळी दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्याची राजकीय धुरा सांभाळण्याबाबत उदयनराजेंनी वक्तव्य केले होते. सध्याही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर दोघांनी चर्चा केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जलमंदिरवर जाताना पाच कॅडबरी नेल्या होत्या. त्यातील १ कॅडबरी उदयनराजेंना दिली, तर ४ कॅडबरी काका धुमाळ यांना दिल्या. यावर ‘काकावर लक्ष ठेवा’ अशी कोपरखळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना मारली. डेअरी मिल्कची सिल्क हर्ट ब्लूश (हृदयाची लाली) ही कॅडबरी शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिली.





