Satara: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून एकमत होत नसल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच, आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी झालेल्या बंद दाराआड बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यासह फलटणचे नेते आमदार रामराजे व संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील संभाव्य समीकरणे, स्थानिक स्तरावरील राजकीय गणिते आणि आगामी रणनीती यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बैठकीत भाजपचा कुठलाही प्रतिनिधी सहभागी नसल्याने राजकीय चर्चांना आणखी जोर आला आहे. पालकमंत्र्यांनी भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट संवाद साधल्याचे चित्र समोर येत असून, त्यामुळे महायुतीत अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र रणनीती आखण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा पातळीवर एकत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी बंद दाराआड झालेल्या खलबतांमुळे साताऱ्यातील राजकारणात नवे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात महायुतीतील पक्षांमधील संबंध कोणत्या दिशेने जातील आणि स्थानिक निवडणुकांत कोणते नवे राजकीय समीकरण आकार घेईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.