Satara : पोलीस विभागाने तपास कामात अधिक सतर्कतेने काम करावे

मायणी : विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागास संशयितांवर कोर्टात खटले दाखल करावे लागतात. मात्र, याबाबतीत पोलीस विभागाने सतर्क राहून काम केल्यास त्यांच्या कामामध्ये अधिक प्रगल्भता निर्माण होईल, असे मत वडूज न्यायालयातील सरकारी अभियोक्ता ॲड. प्रकाश जोशी यांनी व्यक्त केले.
पोलिस तपासी अधिकारी व अंमलदार यांना कोर्ट कामामध्ये येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वडूज पोलीस कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक पाटील, कदम, कांबळे उपस्थित होते. ॲड. जोशी म्हणाले, ‘‘ज्यावेळी तपासी अधिकारी गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात सुनावणी करत असतात.
त्यावेळी तपासामध्ये काही बाबी राहिल्यामुळे आरोप सिद्ध होण्यामध्ये अडचणी येत असतात. त्या संदर्भात तपास करणारे अधिकारी व अंमलदारांनी गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ, पंचनामा, जप्ती, साक्षीदार तपास, तपासाच्या अनुषंगाने पुरावे, कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. नवीन कायदे भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरी न्याय संहिता २०२३, साक्षी, पुरावा अधिनियम यांची ही माहिती घेणे गरजेचे आहे.
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी प्रास्ताविकात म्हणाले, एखादा गुन्हा घडला असेल तर न्यायप्रक्रियेतून शिक्षा होणे गरजेचे असते. मात्र, निर्दोष असून गुन्ह्यात अडकला असल्यास त्यावेळी तपास यंत्रणेने खरा तपास करून त्यास शिक्षा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गुन्हा घडून देखील पुराव्याची नीट मांडणी, कागदपत्रांद्वारे पोलीस कोर्टात करू शकले नाहीत तर तो संशयित खरा गुन्हेगार असून देखील सुटतो.
तपास जलद गतीने पीडितास न्याय मिळण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दोष विरहीत होणे गरजेचे आहे. गुन्ह्याचे दोषारोपण सादर झाल्यानंतर पोलिसांनी काळजीपूर्वक काम करुन न्यायालयात अपेक्षित कसे काम करावे याबाबतीत पोलिसांना सातत्याने सतर्क राहणे गरजेचे आहे.





