सातारा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सातारा जिल्ह्यातील वाटचालीत दि. 18 ते दि. 23 या कालावधीत उपद्रव देणाऱ्या 66 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालखी काळात चोख बंदोबस्त ठेवल्याने ही कारवाई करणे शक्य झाले. पालखी सोहळ्याच्या सातारा जिल्ह्यातील वाटचालीत चोख बंदोबस्त ठेवून उपद्रवी प्रवृत्तींना प्रतिबंध करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक आरती नांद्रेकर, अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके यांचे पथक वारकऱ्यांच्या वेशामध्ये तब्बल पाच दिवस सोहळ्याबरोबर फिरत होते.