कमी पैशात पेरणी करण्याकडे शेतकर्यांचा अधिक कल पुसेगाव – पुसेगाव परिसरात सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. कांदा पीक नगदी असले, तरी दराबाबत बेभरवशाचे आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कांद्याची लागवड करण्याकडे शेतकर्यांचा कल असायचा. आता बदलत्या काळात शेतकर्यांचा कांदा बी पेरणी कमी वेळात व कमी पैशात करण्याकडे अधिक कल आहे. परिसरातील अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने कांदा पेरणी करताना दिसत आहेत. यंदा पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीमध्ये आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचेही दरही वाढले आहेत. त्यामुळे कमी वेळ व कमी खर्चात अधिक कामे करण्यावर शेतकर्यांचा भर आहे. कांदा लागवडीच्या पारंपरिक पद्धतीत सुरुवातीला शेतीची मशागत करावी लागते. त्यानंतर सारे ओढून, त्यामध्ये बी टाकून रोपे तयार केली जातात. लागवडीनंतर दीड महिन्याने रोपे लागवडीयोग्य होतात. त्यात शेतकर्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. रोप लागवडीनंतर चार महिन्यांनी कांदा काढण्यायोग्य होतो; परंतु ट्रॅक्टरच्या साह्याने कांद्याची पेरणी केल्याने वेळेची बचत होऊन खर्च कमी येतो. हा पेरलेला कांदा चार ते पाच महिन्यांमध्ये काढणीयोग्य होतो. ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केल्यास, बी पेरून रोपे तयार करण्याचा खर्च टळू शकतो, त्याचबरोबर मनुष्यबळही कमी लागते. त्यामुळे कांद्याचे बी पेरण्याकडे शेतकर्यांचा अधिक कल आहे. रोपे तयार करून, लागणीला एकरी दहा हजार रुपये मजुरांना द्यावे लागतात. मात्र, ट्रॅक्टरच्या साह्याने कांदा पेरणी केल्यास एकरी 300 रुपये खर्च येतो. त्यामुळे पैसा आणि वेळेची बचत होत आहे. – राजेंद्र काळोखे, शेतकरी, बुध.