Satara : एकही कामगार शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही

कोरेगाव : ज्या कामगारांच्या कष्टातून नवनिर्मिती होते अशा बांधकाम कामगारांसह अन्य क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही कामगार राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ दिला जात आहे अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव येथील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जनसंपर्क कार्यालयात बांधकाम कामगार यांच्यासह अन्य कामगारांची नोंदणी सुरू आहे या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गुरुवारी दुपारी तीन वाजता कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर, नगरसेवक अर्जुनदादा आवटे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी कामगारांची दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते.
मतदारसंघातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य हितासाठी अनेक योजना आणल्या असून त्या मतदारसंघात प्राधान्य क्रमाने राबविल्या जात आहेत. बांधकाम कामगारांसह अन्य कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी ही योजना राबवली जात असून कोरेगाव मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांची नोंदणी राहिली आहे, त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे घेऊन जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.
राजाभाऊ बर्गे म्हणाले की, आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे काम सुरू आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. बांधकाम कामगार व अन्य क्षेत्रातील कामगारांचे हितासाठी त्यांनी नोंदणी शिबिराचे आयोजन केले असूनही नोंदणी ९ जून पर्यंत चालणार आहे. कामगारांनी आवश्यक ती कागदपत्रे तातडीने जमा करून नोंदणी करावी, असे आवाहन बर्गे यांनी केले.
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत नोंदणी केली जाणार आहे. दर रविवारी या कार्यालयाला सुट्टी राहणार आहे.
एक हजार कामगारांची नोंदणी
कोरेगाव येथील नोंदणी शिबिरास कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका आठवड्यात एक हजार कामगारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. 9 जून पर्यंत चालणाऱ्या या नोंदणी शिबिरात जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे. यापूर्वीच्या कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांनी आपल्या मोबाईल हँडसेटसहित त्वरित जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. येताना आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड साईज एक फोटो, मुलांचे आधार कार्ड, सुरू असलेला आणि आधार क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आदी सर्व ओरिजनल कागदपत्रे घेऊन यावीत व नोंदणी करावी.





