कोयनानगर – पाटण तालुक्यात राष्ट्रप्रेम, सामाजिक ऐक्य आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान जागवण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. उद्या दि. ११ रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावरुन सुरू होऊन लोकनेते पंचायत समितीतील बाळासाहेब देसाई भवनामध्ये तिचा समारोप होईल. या रॅलीतून तालुक्यातील जनतेमध्ये देशप्रेम, एकता आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. ‘एक देश, एक ध्वज’ या भावनेने प्रेरित होऊन पाटणकरांनी स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, महिला बचतगट, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणांदेणयात येणार आहेत हातात तिरंगा घेतलेले नागरिक भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत एकात्मतेचा संदेश देतील. रॅलीत शिस्त, अनुशासन आणि उत्साह यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे.