Satara News : कराडमध्ये पिस्तूलसह तिघांना अटक; दारू व्यावसायिकाच्या मुलाचा समावेश

सातारा : कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शामगाव घाट ते कराड रस्त्यावरील दर्शन रसंवतीगृहासमोर रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना देशी बनावटीच्या पिस्तूलांसह ताब्यात घेतले. या तिघांमध्ये कराडमधील एका नामांकित दारू व्यावसायिकाच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सापळा रचून अटक
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी करवडी गावाजवळ सापळा रचला. या कारवाईत कार्तिक अनिल चंदवानी (वय 19, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड), ऋतेष धमेंद्र माने (वय 22, रा. कृष्णा अंगण, सी-3, वाखाण रोड, कराड) आणि अक्षय प्रकाश सहजराव (वय 28, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड) यांना ताब्यात घेण्यात आले. तिघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन देशी बनावटीची पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाइल फोन आणि एक कार आढळून आली. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे साडेआठ लाख रुपये आहे.
दारू व्यावसायिकाच्या मुलाचा समावेश
संशयितांपैकी एकजण कराडमधील एका बड्या दारू व्यावसायिकाचा मुलगा असल्याने या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी सुरू असून, संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कराड तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.





