satara news: विकासकामे मार्गी लावण्यासाठी, गावाचा नावलाैकिक वाढवण्यासाठी एकजूट महत्वाची असते. गावातील वादविवाद, अंतर्गत कलह बाजूला ठेवला तर गावाचा कायापालट होतो. याचा विचार करुन बिचुकले (ता. कोरेगाव) गावात ‘चांगलं चाललंय’ हे घोषवाक्य घराघरावर लिहण्यात आले आहे. चौका चौकात, पारा पारावर ‘चांगलं चाललंय’ चीच चर्चा असून गावातील नकारात्मक वातावरण सकारात्मक होण्यास यामुळे मदत होत आहे. या उपक्रमामुळे गावातील वातावरण आणखी सौदार्हपूर्ण राहत आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियात फक्त भाग घ्यायचा नाही तर ही स्पर्धा जिंकायचीच आहे, असा निर्धार करत ग्रामस्थांनी एकजुटीतून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बिचुकले गावाने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत गावची ओळख निर्माण केली आहे. सरपंच प्रशांत पवार यांनी आपल्या जिल्हा व तालुका स्तरावरील जनसंपर्कामुळे विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. ग्रामस्थांशी समन्वय ठेवत श्री. पवार यांनी गावची ओळख सर्वदूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाच्या विकासात राजकारणाला फाटा देत सर्वांनी एकजुटीने विकास साधावा यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचा प्रत्यय या गावाला भेट दिल्यावर नक्कीच येतो. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर बिचुकले ग्रामस्थांनी एकत्र येत या स्पर्धेत फक्त भागच नाही घ्यायचा तर स्पर्धा जिंकायचीच असा निर्धार केला. सरपंच प्रशांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेवून जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढून जोशपूर्ण घोषणा दिल्यामुळे चैतन्यमय वातावरण तयार झाले. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही सर्व ग्रामपंचायतींना या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार बिचुकले ग्रामस्थ नवीन क्रांती करण्यासाठी एकवटले आहेत. गावातील वातावरण चांगले राहिले तर पंचायत राज अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याने सरपंच प्रशांत पवार यांच्या संकल्पनेतून गावात भिंतीवर ‘चांगलं चाललंय’ हे घोषवाक्य लिहण्यात आले. या वाक्यामुळे नकारात्मकता बाजूला सारुन ग्रामस्थ अभियानात आणखी समरस झाले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, विकास सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, नवोदय मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, जिल्हा परिषद मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आजी माजी सैनिक संघटना, भजनी मंडळ आणि ग्रामस्थ यांनी एकजूट दाखवत अभियानात चमकदार कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. पाच वर्षांचे मानधन देऊन सरपंचांचा पुढाकार बिचुकले गावचे युवा सरपंच प्रशांत पवार यांनी गावाचा विकास करण्याबरोबर अनेक सामाजिक कार्यातही झोकून देवून काम सुरु ठेवले आहे. तळागाळातील लाेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात सहभाग घ्यायचा असेल तर लाेकवर्गणीचा मुद्दा पुढे आला. यावेळी सरपंच प्रशांत पवार यांनी पाच वर्षांचे एक लाख एक रुपये मानधन एकरकमी ग्रामस्थांकडून सुपूर्द करुन नवा आदर्श निर्माण केला. सरपंच पवार यांच्या या निर्णयामुळे त्यांचे व पर्यायाने गावाचे नाव सर्वदूर पोहोचण्यात मदत झाली.