Satara News : लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात संपन्न

पुसेगाव : संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकामध्ये प्रसिध्द असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या स्मृतिदिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता रथपूजन झाले.
रथपूजन सोहळ्यास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ .सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई,प्रांताधिकारी उज्वला गाडेकर,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम,प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य, देवस्थानचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक,यात्रेकरु उपस्थित होते.
गुरुवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका व प्रतिमांची मठाधिपती सुंदरगिरी महाराज, संतोष वाघ व सर्व विश्वस्तांमार्फत रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र पदेश आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटेपासूनच पुसेगाव नगरी फुलून गेली. सकाळी अकरानंतर भाविकांचा रथ व समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता. रथपूजनानंतर रथ गावातून प्रदिक्षणेसाठी मंदिराबाहेर निघाला व त्यानंतर रथाच्या सवाद्य मिरवणुकीस मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.
मिरवणुकीच्या अग्रभागी लेझीम व बँड पथके होती. लाखो भाविकांनी १ रूपयापासून १० हजार रूपयांपर्यंत नोटांचे हार मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने रथावर बांधले. यावेळी श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पेढे, मिठाई व गुलालाची उधळण करण्यात आली. नोटांच्या वर्षावात निघालेली ही मिरवणूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रथदर्शनानंतर भाविकांची पावले यात्रा स्थळाकडे व श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाकडे वळत होती. त्यामुळे यात्रा स्थळही गजबजून गेले होते. रथोत्सवादिवशी आलेल्या सर्व भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येत होता.
यात्रेनिमित्त यात्रास्थळावर स्टेशनरी, सौदर्यप्रसाधने, पाळणे, मिठाई, हॉटेल, स्वेटर, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी , अतिरिक्त अधीक्षक वैशाली कडुकर , यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजश्री तेरणी , सपोनि संदीप पोमण यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनुचित प्रकार घडू नयेत व यात्रा शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे यात्रेकरूंना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे.





