रहिमतपूर : सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलन आणि उपोषण करता येतात, पण जनतेची कामे सत्तेतूनच पूर्ण होतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे माजी नगराध्यक्ष सुनील माने, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड व परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, उदयसिंहदादा पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अजितदादा म्हणाले, महाविकास आघाडीचा प्रयोग करून आम्ही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चालवले. दुर्दैवाने ते सरकार कोसळले. शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करू शकतो, तर भाजपबरोबर का नाही? म्हणून आम्ही भाजपसोबत गेला. परंतु शाहू- फुले-आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. जनतेच्या कामासाठी व विकास कामासाठीच आम्ही भाजपसोबत आहोत. ते पुढे म्हणाले, सुनील माने, शहाजी क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड ही माझी जवळची माणसं आहेत. ती कायमच माझ्याबरोबर होती. त्यांची व माझी विचारधारा एकच आहे. फक्त जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच सुनील माने यांची घर वापसी झालेली आहे. रहिमतपूर नगरपालिकेच्या विकास कामासाठी सुनील माने कमी पडणार नाहीत, त्यांच्या पाठीमागे मी स्वतः आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होतील. रहिमतपूरची माणसं जिद्दी आहेत, पण ही जिद्द चांगल्या कामासाठी वापरणे गरजेचे आहे. सत्तेत आल्यानंतर अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या. ‘लाडकी बहीण’, ‘नमो शेतकरी’, शेतकर्यांसाठी वीजबिल माफी अशा योजनांवर एकूण जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. शासकीय कर्मचार्यांचे पगार आणि कर्जावरील व्याज अशा एकत्रित चार लाख कोटींचा खर्च होत आहे. उरलेल्या तीन लाख कोटी रुपयांत राज्याचा विकास करायचा आहे. केंद्राकडून निधी आणून विकासाचे घोडदळ सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळे सध्या पीककर्जमाफीसाठी निधीअभावी अडचण आहे. मात्र पुढील जून महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबत नियोजन केले जाईल. कृषी विभागासाठी 500 कोटी रुपये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी मंजूर केले आहेत. काळानुरूप शेतीत बदल गरजेचा आहे. यासाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार्या पद्धतीचा अवलंब करावा. यावेळी ना. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनीही सुनील माने यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक केले. तसेच जनतेने त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहावे, असा विश्वास व्यक्त केला. सुनील माने म्हणाले, मी प्रथम नगराध्यक्ष झाल्यापासून आजपर्यंत अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. इथून पुढे अजित दादा देतील ती जबाबदारी पूर्ण करून संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याला राष्ट्रवादीचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहीन. यावेळी रहिमतपूर, धामणेर, सायगाव, किरोली, वाठार, सुर्ली, आर्वी, साप, वेळू, अपशिंगे या परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला. रहिमतपूर नगरपालिकेतील सर्व आजी-माजी नगरसेवक व विकास सेवा सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सुनील माने यांच्यासोबत पक्ष प्रवेश केला. ‘माझ्यावर विनाकारण आरोप’ पार्थ पवार यांच्या प्रकरणावर बोलताना अजितदादा म्हणाले, मला या घटनेची पूर्वमाहिती नव्हती. एक रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही, मग व्यवहार झाला कसा? चौकशीसाठी कमिटी बसली आहे, लवकरच सर्व माहिती समोर येईल. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत. जनतेचे काम करणार्यांवरच आरोप होतात. 70 हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. त्यातले फक्त शंभर कोटीच मला द्या, बाकीचे तुम्हाला घ्या. आजपर्यंत या 70 हजार कोटीचा थांगपत्ता लागलाच नाही. पण आरोप थांबलेले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मिश्किल स्वभावाची झलक यावेळी उपस्थितांना पहायला मिळाली. भाषण सुरू असताना त्यांच्या डोक्यावरील फेट्याचा तुरा निसटला होता त्यावेळी त्यांना चिठ्ठी आली. त्यांनी डोक्यावरील फेटा काढला व माईकवरच म्हणाले, मी टीव्हीमध्ये दिसतोय आणि तुरा निसटलाय, अशी चिठ्ठी आली आहे म्हणून फेटाच काढतो. दादांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमधून जोरदार हशा पिकला.