Satara News – सोनगाव येथील कचरा डेपोमधून बाहेर रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जात असल्याने कचऱ्याचे योग्य विलगीकरण होत नाही. त्यामुळे अन्नाच्या शोधात कुत्र्यांची मोठी गर्दी डेपो परिसरात होत आहे. शेंद्रे, सोनगाव व कुरणेश्वर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून वाहनचालकांवर हल्ल्याची भीती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांच्या अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेषतः बोगदा-शेंद्रे रस्त्यावर वाढलेल्या हॉटेल व्यवसाय व मटन विक्रीच्या दुकानांमधून टाकला जाणारा कचरा कुत्र्यांना आकर्षित करत असल्याने हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. दरम्यान, जकातवाडी येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत भटक्या कुत्र्यांनी ११ जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर जकातवाडी, डबेवाडी, सोनगाव व आसनगाव येथील ग्रामस्थांनी सातारा नगरपालिकेकडे कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण करण्याची मागणी केली आहे. पालिकेकडून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱ्या आणि पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. सोनगाव कचरा डेपो, सातारा शहरात चायनीज पदार्थ विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या गाड्यांवर शिल्लक राहिलेले अन्न, मांसाहारी पदार्थ रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घातले जातात. त्यामुळे या गाड्यांच्या आसपास कुत्री कायम भटकत असतात. रात्रीच्या वेळी जाणाऱ्या पादचारी, वाहनचालकांच्या मागे ही कुत्री धावतात. परिणामी, अपघाताला निमंत्रण मिळते. असेच प्रकार चिकन, मटनाच्या दुकानांजवळही घडत आहेत. शहराच्या मध्यभागाबरोबरच विविध उपनगरांमध्येही हीच परिस्थिती दिसून येते. त्यामुळे पालिकेने संबंधित स्टॉलधारकांना योग्य त्या सूचना द्याव्यात; तसेच भटकी कुत्री पकडून न्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या ही केवळ प्रशासनाची नसून, समाजाच्या सहभागातून आणि योग्य कायदेशीर नियमांचे पालन करूनच सुटू शकते. प्रभावी व व्यापक उपायोजना हव्यात पालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम वेगाने राबवणे आवश्यक आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्वरित कारवाई करावी. कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी सुरक्षित निवारे उभारणे हा एक उपाय असू शकतो. धोकादायक कुत्र्यांना तेथे ठेवणे गरजेचे आहे. शहरात उघड्यावर पडलेला कचरा हे कुत्र्यांचे मुख्य अन्न आहे. कचरा कुंडीमुक्त शहरे आणि योग्य विल्हेवाट लावल्यास कुत्र्यांचे टोळके कमी होऊ शकतात. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न दिल्याने त्यांची आक्रमकता वाढते, त्यामुळे ठराविक ठिकाणीच खाद्याची व्यवस्था करावी. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय सातारा शहर, उपनगर व तालुक्याच्या लगतच्या भागात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे. 2009 मध्ये देवी कॉलनी येथे एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात लहान बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही सातारकरांच्या स्मरणात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता व अद्ययावत यंत्रणेचा अभाव यामुळे निर्बिजीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याची टीका होत असून, पालिकेने यावर युद्धपातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.