मसूर : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून सावत्र भावासह भावजयीने डोक्यात दगड घालून युवकाला गंभीर जखमी केले. नवीन कवठे, ता. कराड येथे ही घटना घडली. याप्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र उत्तम जाधव (वय 35, रा. नवीन कवठे, ता. कराड) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मच्छिंद्र यांचा सावत्र भाऊ लखन उत्तम जाधव व त्याची पत्नी रेश्मा उर्फ माधुरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कवठे येथील मच्छिंद्र उत्तम जाधव यांच्या घराशेजारीच त्यांचा सावत्र भाऊ लखन व त्याची पत्नी रेश्मा उर्फ माधुरी हे दोघे वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपुर्वी मच्छिंद्र हे घरासमोर असताना एक महीन्यापुर्वी माझ्याविरूध्द खोटी तक्रार का दिली, असे म्हणून सावत्र भाऊ लखन याने घरासमोर पडलेला दगड घेवून मच्छिंद्र यांच्या कपाळावर मारला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच रेश्मा ऊर्फ माधुरी हिने लाकडी दांडक्याने मारहाण केली. मच्छिंद्र यांची पत्नी भांडणे सोडविण्यास आली असता संशयीतांनी त्यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मसूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.