Satara News: शाळा म्हणजे जीवन शिक्षणाची मंदिरे! जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रतिपादन
Satara News: ऐतिहासिक प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप.

Satara News – शाळा या जीवन शिक्षण देणारी मंदिरे आहेत. शाळांमधील भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले. सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये सोमवारी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. नगरसेविका भारती शिंदे, किरण पाटील, शाळेचे मुख्याधपक, शिक्षक व पालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, आज प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी शाळेचे नाव देश पातळीवर नक्कीच उज्ज्वल करतील. प्रतापसिंह हायस्कूलला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे प्रकांडपंडित या शाळेत घडले. तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री धनजीशा कूपर यांच्यासह अनेक उद्योजक, कृषितज्ज्ञ या शाळेने घडविले आहेत.
या शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. या शाळेतील विद्यार्थी भविष्यात प्रशासकीय अधिकारी व्हावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे. यावेळी दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने उत्स्फूर्त भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.





