Satara News – शहर कार्बन उत्सर्जन मुक्त बनवण्यासाठी सातारा पालिकेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. वृक्ष संवर्धनाबरोबर अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर, पाण्यापासून वीज निर्मिती आणि शहरात ठिकठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जर पॉइंट तसेच सोलरवर चालणाऱ्या मिनी बसेस या विविध माध्यमांतून शहरात कमीत कमी प्रदूषण होईल यादृष्टीने पालिकेने पावले उचलली आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्राच्या साधारण साडे 28 टक्के वनक्षेत्र असल्यामुळे अजूनही जिल्ह्याची भौगोलिक रचना पर्यावरणाला अनुकूल आहे. शहराच्या विस्ताराचा विचार करता शहर व परिसरामध्ये 18 टक्के वनच्छादन असून कार्बन उत्सर्जन शोषले जात आहे. मात्र, सातारा शहर परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये यवतेश्वर, उंटाचा डोंगर, सोनगाव कचरा डेपो पिछाडी, लिंब खिंड परिसर या भागामध्ये वणवा लागण्याच्या 13 घटना घडल्या. तसेच महाड- पोलादपूर- सातारा व सातारा- लोणंद या दोन महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शेकडो वृक्षांची तोड करण्यात आली. केवळ इमारतीला अडथळा होतो म्हणून सातारा पालिकेच्या वृक्ष विभागाने गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 133 झाडे तोडण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सातारा शहराच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. शहरातील रस्त्यांची लांबी साधारण दहा किलोमीटरपेक्षा जास्त नाही. मात्र, एकूण वाहतूक साधनांच्या तिप्पट वाहने रस्त्यावर असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन प्रदूषणात भर पडत आहे. दुसरीकडे सोनगाव कचरा डेपोमध्ये बायोमायनिंग ठप्प झाल्याने मिथेनसारखे विषारी वायू हवेत पसरून हवा प्रदूषित होत आहे. सातारा नगरपालिका पालिकेचा वीस उद्यानांचा प्रस्ताव सातारा पालिकेने शहर आणि हद्दवाढ क्षेत्रात तब्बल वीस उद्याने बनवण्याचा संकल्प सोडला असून पहिल्या टप्प्यामध्ये पाच उद्याने बनवून तयार झाली आहेत. शहराची हवा ताजी व खेळती राहण्याच्या दृष्टीने शहराच्या चार कोपऱ्यांमध्ये मोठी उद्याने तसेच वॉकिंग ट्रॅक, ट्री पायथॉन त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी, पॅगोडा असे विविध प्रकार या उद्यानांमध्ये अवलंबले जात आहे. शहरामध्ये यापूर्वी आठ उद्याने अस्तित्वात असून आणखी वीस उद्यानांची त्यात भर पडत आहे. गोडोली येथे उभारण्यात आलेल्या आयुर्वेदिक गार्डन परिसरामध्ये औषधी व दुर्मीळ वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे. सातारा पालिकेने भूमी थिमॅटिक संकल्पनेवर ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता. तोच वारसा पुढे सुरु ठेवण्याचा सातारा पालिकेचा मानस आहे. अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर शहरामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने पालिकेने ठोस उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. सोनगाव कचरा डेपोवर सोलर प्लांट बसवून ते सज्ज ठेवण्यात आले असून त्याला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट एजन्सीची तांत्रिक परवानगी मिळणे फक्त बाकी आहे. सौरऊर्जेद्वारे शहरातील काही प्रभाग सौर प्रभाग करण्याचा पालिकेचे नियोजन आहे. कास पठारावरून पॉवर हाऊसला येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करून शहराच्या पूर्व भागाला वीज पुरविण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या परिसरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारले आहे. त्याचबरोबर शहरात अन्यत्र तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नियोजन केले होते. विद्यमान मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे आता या प्रकल्पांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चार कोटीची तरतूद सातारा पालिकेने शहराचे पर्यावरण संवर्धन करण्याच्यादृष्टीने वार्षिक अंदाजपत्रकामध्ये चार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मोकळ्या जागा शोधून तेथे दुर्मीळ तसेच औषधी वनस्पतींची लागवड करणे, वनस्पतींना संरक्षण देऊन त्याला नियमित पाणी देणे, इलेक्ट्रो चार्जिंग कीटसाठी देखभाल दुरुस्तीची यंत्रणा उपलब्ध करणे, हवेचा निर्देशांक ठरवणारी मापक यंत्रणा जागोजागी बसवणे आणि त्यातून हवेची गुणवत्ता तपासून त्याचा अहवाल तयार करणे अशा विविध उपाययोजना हवेची पातळी संतुलित ठेवण्याच्या दृष्टीने केल्या जात आहे.