satara news: सातार्याच्या राजकारणामध्ये पक्षीय निकष आणि नव्या चेहर्यांना संधी या मुद्द्यांवर बर्याच प्रस्थापितांचा पत्ता कापला गेला आहे. त्यामुळे बंडखोरीचा भडका उडणार हे निश्चित. बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही राजांनी राजकीय चाणाक्षपणे एबी फॉर्मचा सस्पेन्सही शक्य तितका ताणण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपमधील इच्छुकांची नाराजी ही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत सातारा शहराचे राजकारण अनेक वळणावळणाच्या घाटातून प्रवास करणार आहे. नव्या दमाचे चेहरे आणि आरक्षणाचे अवधान बाळगताना पक्षाचे निकष दोन्ही राजांसाठी अत्यंत अडचणीचे ठरत आहेत. एकाच प्रभागांमध्ये दोन-तीन दिग्गज आमने-सामने आल्यामुळे मनोमिलनात कोणाला संधी द्यायची, यावर ताक सुद्धा फुंकून प्यावे लागत आहे. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 11 मध्ये सातारा विकास आघाडीचे उदयनराजे समर्थक वसंत लेवे यांनी अपक्ष अर्ज भरला तर तेथून पक्षाच्या चिन्हावर इच्छुक असणार्या अविनाश कदम यांची अडचण होणार आहे. लेवे यांची या भागावर असलेली पकड, गेल्या चार वर्षांमध्ये केलेली विकासकामे, घरटी असलेला संपर्क यामुळे येथून विजयाचा गुलाल माझाच, असा दावा लेवे यांचा आहे, तर अविनाश कदम यांनीही येथून जोर लावला आहे. त्यामुळे उरमोडी च्या काठावरील राजकीय चर्चेमध्ये प्रभाग क्रमांक अकरावर चर्चाच होऊ शकली नाही. सातार्यातून अनेक दिग्गजांची नावे स्पर्धेतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक सात मध्ये अक्षय मतकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा असल्याने तेथील दिग्गज मनोज शेंडे यांनी अपक्ष तयारी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये दत्तू धबधबे आणि सोनिया शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे इथून सावित्री बडेकर यांचा पत्ता कट होणार असून त्या यादीमध्ये विनोद खंदारे यांचे सुद्धा नाव आहे. त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये अशोक मोने, सागर पावशे, किशोर पंडित असे तीन दिग्गज इच्छुक असताना त्या स्पर्धेत अशोक मोने यांचा पत्ता कापला जाईल की काय ? अशी राजकीय परिस्थिती आहे. सातारा विकास आघाडीच्या महिला उमेदवार माजी नगराध्यक्ष स्मिताताई घोडके व सुजाता राजेमहाडिक यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र तिथेही अजून तळ्यात मळ्यातच सुरू आहे. प्रभाग 17 मधून फिरोज पठाण, आशुतोष चव्हाण, सुवर्णा पाटील, धनश्री महाडिक हे चार दिग्गज स्पर्धेत असताना तेथे कोणाला संधी द्यायची यावर सुद्धा निर्णय झालेला नाही. तिथे कोणाचा पत्ता कापला जाईल, याची सुद्धा शाश्वती नाही. एबी फॉर्मचा सस्पेन्स ताणला जाणार दोन्ही राजांनी बंडखोरी टाळण्यासाठी आणि महाविकास आघाडीला त्याचा राजकीय फायदा होऊ नये म्हणून एबी फॉर्मचा सस्पेन्स प्रचंडपणे ताणत सर्वांना राजकीय दृष्ट्या झुलवले आहे. रविवारी रात्री गोपनीयरीत्या एबी फॉर्म रवाना करण्याची राजकीय रणनीती आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक त्यातल्या त्यात इच्छुक फॉर्म भरून तयार आहेत. मात्र एबी फॉर्म नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांची अडचण झाली आहे. ए बी फॉर्म मिळणारे 50 भाग्यवंत कोण ? याची सातार्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. रविवारी सुद्धा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म घेतले जाणार आहेत. त्यामुळे उद्या आणि सोमवार दिनांक 17 रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात असणार आहे. तिथेच सातार्याच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार असून कोण रिंगणात आणि कोण रिंगणा बाहेर, याची सुद्धा उत्तरे मिळणार आहेत. भाजपचे नाराज आमच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातार्यासाठी वेळ देत भाजपच्या नाराजांना चुचकारण्यासाठी राजकीय डाव टाकले आहेत. सातार्यातील बंडखोरी ही शक्य तितकी रोखण्याची दोन्ही राजांची खेळी आहे. मात्र नाराजांना थोपवणेसुद्धा अशक्य होणार आहे. त्यामुळे असे नाराज महाविकास आघाडीच्या पंखाखाली घेऊन महायुतीला टक्कर देण्याची रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादीकडे 233 जागांसाठी जिल्ह्यातून 67 अर्ज दाखल झाले. त्यामुळे ही राजकीय लढत पुरेशी ठरेल असे नाही. मात्र सातार्यातून शशिकांत शिंदे यांना वेगळ्या अपेक्षा आहेत. सातारा पालिकेच्या राजकारणावरच त्यांची खरी भिस्त आहे. भाजपच्या नाराजांना आम्ही निश्चित संधी देऊ; ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करून शशिकांत शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. हा दावा आणि त्याची वस्तुस्थिती याचे चित्र महाविकास आघाडीच्या शेवटच्या दिवशी दाखल होणार्या उमेदवारांच्या यादीवरून लक्षात येणार आहे.