Satara News : पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावाने चेरापुंजीला मागे टाकत केली सर्वाधिक पावसाची नोंद

कोयनानगर : पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावाने ३१ मे २०२४ ते १ जून २०२५ या कालावधीत ७,३५९ मिलिमीटर पावसाची नोंद करत महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या आकड्याने पाथरपुंजने देशातील प्रसिद्ध चेरापुंजीलाही (५,९३८ मिमी) मागे टाकले आहे.
जून ते ऑगस्ट २०२४ या तीन महिन्यांत पाथरपुंजमध्ये ७,३५९ मिमी पावसाची नोंद झाली, तर २०१९ मध्ये याच गावाने ९,९५६ मिमी पावसाचा विक्रम नोंदवला होता. यंदाचा आकडा पुन्हा त्या दिशेने वाटचाल करत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या बाबतीत पाथरपुंज अव्वल असून, त्यापाठोपाठ वाळवण (६,७३८ मिमी), नवजा (६,२५० मिमी), दाजीपूर (६,२०३ मिमी), निवळे (६,०२६ मिमी) आणि महाबळेश्वर (५,९६२ मिमी) यांचा क्रमांक लागतो. हवामान बदलामुळे या भागात पावसाची तीव्रता आणि प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पाथरपुंज आता केवळ ‘पावसाचे गाव’ न राहता हवामान अभ्यासकांचे लक्ष वेधणारे केंद्र बनले आहे.





