प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्य शासनाने अंगणवाड्यांचे रुपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 4 हजार 928 अंगणवाड्या पैकी 1 हजार 482 अंगणवाड्यांना हे किट मिळाले असल्याने अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत या माध्यमातून अंगणवाड्यांचा दर्जा वाढवून त्यांना स्मार्ट अंगणवाडी कीट देण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्राचे रुपांतर आता आदर्श, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येत आहे. सक्षम अंगणवाडी योजनेमुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व पोषण आहारासाठी स्वच्छतेसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी लागणारे आधुनिक साहित्य पुरवले जाईल. यामुळे अंगणवाड्यांमध्ये मुलांसाठी आनंदी, सुरक्षित आणि शिकण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.सातारा जिल्ह्यात 4 हजार 928 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी सन 2024 -25 या आर्थिक वर्षात 1482 अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी साहित्य पुरवठा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. शासन नियुक्त एजन्सीमार्फत या अंगणवाड्यांना 43 इंची एलईडी टीव्ही, आरओ युनिट, पोषण वाटिकेमध्ये फावडे, खुरपे, टिकाव, घमेले, पाणी कॅन, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासह अन्य साहित्य मिळणार आहे. स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे. दूरदृष्टीचे पाऊल ठरणार अंगणवाड्या आधुनिकीकरणामुळे केवळ मुलांसाठीच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठीही एक महत्त्वाचे केंद्र बनण्यास मदत होणार आहे. अंगणवाड्यांना भौतिकदृष्ट्या अद्ययावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती, बालकांचा सर्वांगीण विकास, विविध उपक्रमाद्वारे महिला बालके, किशोरींना विविध सेवा देणे यासाठी स्मार्ट अंगणवाडी ही योजना सातारा जिल्ह्यात उपयुक्त ठरणार आहे.