सातारा – भारतीय जनता पक्षाच्या सातार्यातील नेत्यांनी बंडखोर अपक्षांना कारवाईचा दम भरल्यानंतर शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अपक्षांची समजूत घालणे, समन्वय बैठका, मनधरणी यामुळे तीन दिवसांत 89 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी शहरातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात असून, सदस्यपदांच्या 50 जागांसाठी 178 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतील अशोक राजाराम मोने, बाळासाहेब पुंडलिक शिंदे, सुहास एकनाथ मोरे, शिवाजी नारायण भोसले, शंकर रामचंद्र माळवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली. नगरसेवकपदांसाठी 339 उमेदवारी अर्ज दाखले झाले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 14 उमेदवारांनी, तर शेवटच्या दिवशी 70 उमेदवारांनी माघार घेतल्याने, मनोमिलनातील शिष्टाई यशस्वी झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत लेवे (प्रभाग 11), श्रीकांत आंबेकर यांच्या पत्नी स्वाती आंबेकर (प्रभाग 15), शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक दत्तू धबधबे (प्रभाग 13), प्रभाग 21 मधून किशोर पंडित, प्रभाग 12 मधून पोपट कुंभार, प्रभाग 15 ब मधून उदयनराजे यांचे समर्थक अमोल पाटोळे यांच्या पत्नी पल्लवी पाटोळे, प्रभाग 14 ब मधून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अक्षय गवळी, 21 अ मधून धनंजय पाटील, प्रभाग 14 ब मधून नासीर शेख, 21 ब मधून सागर पावशे यांच्या पत्नी रूपाली पावशे या चर्चेतल्या उमेदवारांनी माघार घेतली. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी निवडलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी अपक्षांना थांबवणे गरजेचे होते. जे आवाहनाला प्रतिसाद देतील, त्यांना सांभाळून घेऊ. अन्यथा पक्ष कारवाई करेल, अशी तंबी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्याने, अपक्षांनी शस्त्रे खाली टाकली. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी दोन्ही नेत्यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगरसेवकपदांच्या स्पर्धेतील 70 आणि नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतील पाच अशा एकूण 75 जणांनी माघार घेतली. अपक्षांचे फोन स्विच ऑफ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मनोमिलनातील उमेदवारांना दगाफटका होऊ नये, यासाठी नेत्यांनी अपक्षांना थेट फोन करून त्यांना अर्ज माघारीसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. ही शिष्टाई अनेक ठिकाणी यशस्वी झली. मात्र, काही अपक्ष उमेदवार फोन बंद करून, शहरातून गायब झाले होते. शाहूपुरीतील संजय पाटील आणि प्रभाग 5 मधील शिवानी कळसकर हे बाहेरगावी असल्याने, तेथील प्रयत्नांना यश आले नाही.