महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत महाबळेश्वरच्या मतदारांनी भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घातली. त्यांच्या समवेत पक्षातील १३ नगरसेवकांना निवडून देत महाबळेश्वर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याच्या निमित्ताने नगराध्यक्ष, नगरसेवक व समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपरिषद कार्यालय अशी पायी पदयात्रा काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व दुर्गादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच आंबेडकर पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. दोन्ही चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी खासदार नितीन पाटील यांनी नगराध्यक्षांना शुभेच्छा देताना सांगितले की, मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत मोठ्या मताधिक्याने उमेदवारांना निवडून दिले आहे. महाबळेश्वरमधील समस्या प्रामाणिकपणे सोडवून शहराचा कायापालट करावा, तसेच पर्यटकांसाठी विविध उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सुचवले. या सोहळ्यासाठी नगरपरिषद प्रशासनामार्फत जय्यत तयारी करण्यात आली होती. नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी दालनाची डागडुजी करण्यात आली होती. गेले आठ दिवस हे काम सुरू होते. नगराध्यक्षांनी फीत कापून आपल्या दालनात प्रवेश केला. हा सोहळा पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू राजपुरे, संजय गायकवाड, महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक नासिर मुलाणी, विद्या बावळेकर, संगीता वाडकर, विमल पारठे, संजय जंगम, अफजल सुतार, संतोष शिंदे, संतोष आखाडे, प्रियांका वायदंडे, राहुल पिसाळ, रोहित ढेबे, रेश्मा ढेबे, पल्लवी कोंढाळकर, स्मिता पाटील उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे वडील लक्ष्मण शिंदे, आई, बंधू किसन शिंदे, डी. एल. शिंदे, नाना शिंदे व कुटुंबीयांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नगरपरिषदेचा कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.