Satara News : उंडाळेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

उंडाळे : कराड तालुक्यातील उंडाळे येथील बचपन स्कूलच्या पाठीमागे शुक्रवारी बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी ताज्या असतानाच आज शनिवारी कराड- चांदोली रस्त्यावरील येणपे- शेवाळेवाडी गावाच्या वेशीवर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. कराड दक्षिण विभाग डोंगराळ भाग असल्यामुळे उंडाळेसह अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असते.
अनेक वेळा बिबट्याने रानातील वस्तीवरील असणाऱ्या जनावरांवर हल्ला करणे, गाडीचा पाठलाग करणे अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. घडलेली घटनेच्या जवळपास डोंगरी भाग जास्त आहे त्यामुळे जंगली जनावरांचा या ठिकाणी वावर जास्त आहे. डोंगर पठारावर अतिशय नियोजित पद्धतीने झाडांचे जतन केलेले असून या ठिकाणी मोठे जंगल असून वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो.
सर्वत्र बागायती क्षेत्र व या गावात सध्या कारखान्याच्या ऊस तोडी चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र मोकळे होत असल्यामुळे अनेक जंगली प्राणी वारंवार शेतकऱ्यांच्या नजरेत पडत आहेत. यामुळे या ठिकाणी नेहमी बिबट्यांचा वावर दिसू लागला आहे. आज सायंकाळी सात वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी होऊन थोड्या वेळातच मृत पावला. या ठिकाणी वनीकरण विभागाचे अधिकारी आल्यानंतर पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली.





