प्रभात वृत्तसेवा सातारा – पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकाभिमुख प्रशासन अस्तित्वात आले आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पालिकेत बैठकांचा सपाटा लावला आहे. असे असताना कास धरणाच्या गळतीसाठी घेतलेल्या शट डाऊनचा शहराच्या पश्चिम भागाला जोरदार फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे तीव्र पाणीटंचाई असून सात टँकरद्वारे सात लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात आले आहे. टँकरच्या तुलनेने पाण्याची मागणी मोठी असल्याने अजूनही बऱ्याचशा भागांमध्ये भौगोलिक रचनेमुळे टँकर पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत. पालिकेने दहा हजार लिटरचे दोन तर पाच हजार लिटरचे पाच स्वतंत्र टँकरची खरेदी केली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या दोन दिवसांमध्ये कास धरण योजनेसंदर्भातील जलवाहिनीच्या 18 ठिकाणी गळत्या काढल्या असून 40 ठिकाणी जोड पाईप आणि त्याचे व्हॉल्व्ह बदलणे अशी दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या कामांची पाहणी करून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही दिले होते .कासाडी ते गणेश खिंड यादरम्यानची अंतिम टप्प्यातील दुरुस्ती अतिशय क्लिष्ट स्वरूपाची होती. या पाईपला स्वतंत्र जोड देण्याचे काम आव्हानात्मक काम होते. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे आणि त्यांच्या पथकाने हे काम सुरळीत पार पाडले आहे. कासच्या शट डाऊनचा फटका सातारा पालिकेने दि. ५ ते ७ जानेवारी दरम्यान शट डाऊन घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने शहाजी वाठारे, दोन अभियंते आणि 14 कर्मचारी हे दुरुस्ती प्रक्रियेच्या मोहिमेत मग्न होते. शहराच्या पश्चिम भागातील विशेषता गणेश टाकी, कात्रेवाडा टाकी, खाणं टाकी यामुळे पोळ वस्ती, होलार वस्ती,मंगळवार पेठेचा डोंगर भागातील परिसर, तसेच यादोगोपाळ पेठेतील उताराचा भाग, रामाचा गोट परिसर, चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ ते सोमवार पेठ तसेच फुटका तलाव परिसर, काशीविश्वेश्वर मंदिर परिसर या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. पॉवर हाऊस येथील टाकीवर अवलंबून असणाऱ्या समाधीचा माळ, पाटील नर्सरी तसेच शिंपी आळी, धुमाळ आळी या भागांतही पाण्याची टंचाई जाणवली. पालिकेने सात टँकर आणि मोहिमेवर पाठवले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये 72 ठिकाणांवरून पाण्याची मागणी होती. दोन दिवसांमध्ये टँकरमधून टंचाईग्रस्त भागाला सात लाख लिटरपेक्षा अधिक पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात आला. मात्र, तरीही डोंगरउतारावरील वस्तीला बऱ्याच ठिकाणी टँकर पोहोचू न शकल्याने टँकरपर्यंत धावपळ करत पोहोचावे लागले .या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांची बरीच अडचण झाली . विस्तारित पाइप योजनेलाही गती कास धरण योजनेच्या विस्तारित पाइपलाइन योजनेला सुद्धा गती देण्यात आली आहे. या योजनेच्या पुढील टप्प्यातील साडेतीन किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर उरकण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सूचना दिलेल्या आहेत. या योजनेच्या पूर्णत्वानंतर सातारा शहरातील नागरिकांना जास्त दाबाने अधिक वेगाने पाणी मिळणार आहे.