Satara News : कोयना नदीचा प्रकोप ! कराड-चिपळूण मार्ग बंद; 246 नागरिकांचे स्थलांतर

कोयनानगर : मुसळधार पावसासह कोयना धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कोयना नदीने धोकादायक स्वरूप धारण केले आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत असून कोयना विभागातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे.
हेळवाक गावात नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली असून प्रशासनाने ५ घरे व १४ दुकाने सुरक्षित स्थळी हलवली आहेत. महादेववाडीतील ४ घरे तसेच हुंबरळी गावातील तब्बल २४६ नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. या सर्वांना कोयनानगर येथील करमणूक केंद्र, मराठी शाळा व नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, हेळवाक येथे कराड–चिपळूण राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी कोकण–पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्ध पातळीवर काम करत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातील विसर्ग वाढल्यास परिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.





