Satara News : कोयनानगरमध्ये अवतरणार ‘कोयना गार्डन’: पर्यटनाला मिळणार नवी दिशा

कोयनानगर : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवे वैभव प्राप्त करून देणारा ‘कोयना गार्डन’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प कोयनानगर येथे आकार घेत आहे. राज्याचे पर्यटन व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या प्रकल्पाला राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून, पर्यटन विभागाने यासाठी सविस्तर आराखडा तयार केला आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोयना परिसरात निर्माण होणाऱ्या या गार्डनमध्ये पर्यटकांना अत्याधुनिक आणि अनोख्या सुविधांचा अनुभव घेता येईल. यामध्ये थ्रीडी रेंडरिंग एन्ट्रान्स गेट, थ्रीडी पाथवे, माईंड ध्यानमुद्रा, ग्लास स्काय वॉक, विविध स्वरूपातील जलप्रवाह, होलोग्राफिक प्रोजेक्शन जिओडेसिक डोम, आकर्षक फूड कोर्ट, आरामदायी बसण्याची व्यवस्था, आधुनिक बेंचेस, टॉयलेट ब्लॉक, मार्गदर्शक फलक, आणि हवामानाचा आनंद घेण्यासाठी कव्हर्ड सिटिंग एरिया यांचा समावेश आहे.
या गार्डनमध्ये पर्यटकांना दिवसभर आनंद घेता यावा यासाठी कलात्मक स्थापत्य, फुलझाडांची सजावट, आकर्षक प्रकाशयोजना, जलप्रवाह आणि धबधब्यांचा समावेश असेल. रात्रीच्या वेळी विशेष लाईट शो आणि होलोग्राफिक प्रोजेक्शनमुळे हा परिसर जणू जादुई वातावरणात न्हाऊन निघेल. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेलच, शिवाय स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच छोटे व्यवसाय, हॉटेल्स, होम स्टे, टॅक्सी सेवा आणि हस्तकला विक्रीला प्रोत्साहन मिळेल.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या या उपक्रमामुळे कोयनानगरचा कायापालट होणार असून, कोयना धरण, वन्यजीव, डोंगररांगा आणि आता ‘कोयना गार्डन’ यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून देशभरात नावलौकिक मिळवेल, अशी आशा आहे.





