Satara News – सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी घडलेल्या शाब्दिक संघर्षानंतर उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांच्या कार्यपद्धतीवरून सातारा शहराच्या राजकारणात नव्याने चर्चा रंगू लागली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे विश्वासू आणि सातारा विकास आघाडीतील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या बनकर यांच्याविरोधात आता त्यांच्या स्वतःच्याच गटातून नाराजी व्यक्त होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे. सातारा शहराच्या राजकारणात तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ सक्रिय राहून खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेला शहर व तालुक्यात धार देणारे अॅड. दत्ता बनकर हे एकेकाळी आघाडीचे ‘रणनीतीकार’ मानले जात होते. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, शहरातील संघटनात्मक राजकारणात स्वतःची छाप निर्माण केली; मात्र, सध्या त्यांच्या राजकीय शैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पालिकेच्या सभेत बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांनी थेट बनकरांवर “हुकूमशाही”चा आरोप करत त्यांची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले. सभागृहात झालेल्या या थेट टीकेने केवळ विरोधकच नव्हे तर खासदार गटातील अनेक सदस्यही अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. अॅड दत्ता बनकर आणि उदयनराजे भोसले उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी मनोज शेंडे यांचे नाव आघाडीत आघाडीवर मानले जात असताना, शेवटच्या क्षणी अॅड. बनकर यांनी स्वतःचे नाव पुढे आणत बाजी मारली होती. त्या निवडीमागे पडद्यामागील राजकीय हालचाली झाल्याच्या कथा आजही राजकीय वर्तुळात रंगतदारपणे सांगितल्या जातात. मात्र, पद मिळवल्यानंतर बनकर यांच्या कार्यपद्धतीवर सहकारी नगरसेवकांनीच नाराजी व्यक्त केल्याचे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. महिला नगरसेविकांच्या प्रश्नांवर ठामपणे उभे न राहणे, सभागृहात सदस्यांना पुरेसा वेळ न देणे, ज्येष्ठ नगरसेवकांशी कठोर भाषेत संवाद साधणे, “महाराजांनी सांगितलं आहे”. या वाक्याच्या आधारे विषय मंजूर करण्याचा प्रयत्न करणे, तसेच “मी आहे ना”, “डोन्ट वरी”, “वेल डन” अशा राजकीय आश्वासनांच्या माध्यमातून सदस्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करून नंतर त्यांनाच अडचणीत आणल्याची भावना काही नगरसेवकांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. अॅड. दत्ता बनकर हे सातारा विकास आघाडीचे आक्रमक आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जात असले तरी सहकारी नगरसेवकांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी अजूनही कायम आहेत. नगरसेविकांना स्वतःची भूमिका मांडण्यासाठी पुरेशी संधी मिळत नसल्याची भावना देखील उघडपणे व्यक्त होत आहे. त्यामुळे आता शहराच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जाऊ लागला आहे, “उपनगराध्यक्षांचं खरंच चुकतंय काय?”