प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरालगतच्या महादरे येथील भारतातील पहिल्या फुलपाखरु संवर्धन राखीव क्षेत्राला वन विभागाने वेळीच योग्य संरक्षण पुरवणे गरजेचे बनले आहे. या परिसरामध्ये खासगी प्लॉटिंगचे प्रस्थ वाढू लागल्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. वन विभागाने हद्दीमध्ये कुंपण करून येथील जैवविविधतेला संरक्षण द्यावे आणि फुलपाखरु राखीव क्षेत्राचा बचाव करावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. सातारा शहराजवळील महादरे येथे फुलपाखरु संवर्धन राखीव क्षेत्राला राज्य सरकारने जून 2022 मध्ये मान्यता दिली. हे क्षेत्र पश्चिम घाटातील जैवविविधतेचा भाग असून येथे फुलपाखराच्या 180 हून अधिक प्रजाती आढळतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी व संशोधकांना हे क्षेत्र अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे आहे. यवतेश्वर घाटाच्या पायथ्याला आणि सातारा शहराच्या पश्चिमेला अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या महादरे गावातील आणि लगतच्या वनक्षेत्राला हा दर्जा मिळालेला आहे.महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पश्चिम घाटातील आढळणाऱ्या 341 फुलपाखरांच्या प्रजातीपैकी 180 प्रजाती एकट्या महादरे परिसरामध्ये आहे. महादरे येथे 105 हेक्टर पसरलेल्या जंगलात 467 वनस्पती प्रजाती असून 47 रानभाज्यांची नोंद येथे आहे. उभयचर प्रजाती 16, पतंग 80 प्रजाती, कोळी 110 प्रजाती तसेच अडीच हजाराहून अधिक मोर या भागांमध्ये आहे . वाढत्या शहरीकरणाचा धोका सातारा शहराचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये पेढ्याचा भैरोबा या डोंगरालगत नागरी वस्ती वेगाने वाढत आहे. महादरे राखीव क्षेत्रालगतच खासगी विकसकांचे प्लॉटिंग सुरू झाले असून तेथे कमान टाकून रस्ते बांधणीला सुरुवात झाली आहे. या प्रकारामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. कृष्णेश्वर मंदिर परिसराची पिछाडी आणि महादरे परिसराचे जंगल हा सध्या बिबट्याचा भ्रमण मार्ग सुद्धा बनलेला आहे. तसेच हा भाग अजूनही जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. या समृद्धतेला खासगीकरणाचे नख लागल्यास येथील अन्नसाखळी तसेच परिस्थिती धोक्यात येणार आहे. त्यामुळे सातारा वन विभागाने तात्काळ लक्ष घालून वन विभागाची येथील हद्द निश्चित करावी, येथे खासगी प्लॉटधारकांचे अतिक्रमण होण्याचा धोका पर्यावरण प्रेमींनी ओळखून त्याबाबतचा पाठपुरावा सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्याकडे केला आहे.