Satara News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद, जलसाठ्यात वाढ

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नवजा आणि महाबळेश्वर या दोन प्रमुख ठिकाणी मुसळधार पावसाची स्पर्धा रंगली असून, अवघ्या ५६ दिवसांत दोन्ही ठिकाणी ३००० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीत नवजामध्ये ३०३४ मिलिमीटर, तर महाबळेश्वरमध्ये ३०७३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. कोयनानगरमध्येही २८१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या मुबलक पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून, जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरण प्रशासनाने नियोजित पद्धतीने दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे. १५ ते २४ जुलै या कालावधीत १० टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले, यापैकी ५ टीएमसी पाणी कोणत्याही उपयोगाशिवाय वाहून गेले.
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरणात आणखी पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने विसर्गाचे नियोजन आणि सुरक्षितता यासाठी पूर्ण तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.





