Satara News – राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक माजी सैनिक कल्याण केंद्र उभारण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष निधी समितीच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील लोकभवन येथे पार पडलेल्या या बैठकीस माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई व अधिकारी उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. पंढरपूर येथे दरवर्षी होणारी मोठी वारी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, माजी सैनिकांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्याचप्रमाणे सातारा येथेही आवश्यक जागा उपलब्ध असल्याने तेथे केंद्र उभारण्याचा निर्णय पुढे नेण्यात आला आहे. बैठकीत माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लष्करी मुला-मुलींसाठी वसतिगृहे, माजी सैनिक विश्रामगृहे, महासैनिक हॉल आणि लॉन्स अधिक सक्षम करण्यास मान्यता देण्यात आली. पुणे येथील सैनिक कल्याण संचालनालयातील अशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस आणि किमान वेतन कायद्यानुसार करण्यात आलेल्या पुनर्निर्धारणालाही कार्योत्तर मान्यता देण्यात आली. राज्यपालांनी बैठकीत व्यावसायिक स्वरूपात चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्याचे निर्देश देत, या उपक्रमांमध्ये माजी सैनिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची सूचना केली. या निर्णयांमुळे राज्यातील माजी सैनिकांच्या पुनर्वसनाला नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या सन्मान आणि कल्याणासाठी शासन अधिक सक्षमपणे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. साताऱ्यात केंद्रासाठी जमीन उपलब्ध – मंत्री शंभूराज देसाई या प्रस्तावाला पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनीही पाठबळ दिले असून, सातारा येथे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. त्यानंतर राज्यपालांनी दोन्ही ठिकाणांच्या प्रकल्पांसाठी आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय बाबी तपासून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.