Satara News : वन विभागामार्फत आता ‘प्लॅस्टिकमुक्त महाबळेश्वर’ अभियान; उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची संकल्पना
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती प्रतापसिंह उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक स्टॉलधारक, व्यापारी व व्यावसायिकांनी ‘सिंगल युज प्लॅस्टिक’”चा वापर पूर्णपणे बंद करून या अभियानात (Satara News) सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Satara News : महाबळेश्वर व परिसरातील निसर्गवैभव जपण्यासाठी वन विभागाच्यावतीने जैवविविधता व पर्यावरण संवर्धनासाठी ‘प्लॅस्टिकमुक्त महाबळेश्वर अभियान’ राबविण्यात येणार आहे. शहर व परिसरातील पर्यटनस्थळांवर प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी (Satara News) काचेच्या बाटल्यांचा वापर वाढावा यासाठी वन विभागाकडून पुढील काही दिवसांत कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सातारा येथील उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती प्रतापसिंह उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक स्टॉलधारक, व्यापारी व व्यावसायिकांनी ‘सिंगल युज प्लॅस्टिक’”चा वापर पूर्णपणे बंद करून या अभियानात (Satara News) सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, गटविकास अधिकारी विजय विभुते, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वन मंडळ अधिकारी सुनील लांडगे, माजी नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर यांच्यासह हिलदारी सदस्य, वनरक्षक, सफाई कर्मचारी आणि वेण्णा लेक स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमोल सातपुते म्हणाले, ‘‘देशात अनेक गिरीस्थाने आणि हिल स्टेशन आहेत. मात्र, महाबळेश्वरने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. शंभू महादेवाचे स्थान, पाच नद्यांचे उगमस्थान आणि राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला झालेली ही पवित्र भूमी ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेली आहे. महाबळेश्वर परिसरातील जवळपास दोन तृतीयांश भाग जंगलांनी व्यापलेला असून येथील समृद्ध वृक्षसंपदा आणि वन्यजीव हे या भागाचे मोठे वैभव आहे.’’ मात्र, वाढत्या प्लॅस्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जंगल परिसरात प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने वन्यजीव व परिसंस्थेवर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गटविकास अधिकारी विजय विभुते व पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी वन विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत करत स्वच्छ आणि सुंदर महाबळेश्वरसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
काचेच्या बाटल्या वापरण्याचे आवाहन
महाबळेश्वरचे नंदनवन अबाधित ठेवण्यासाठी ‘प्लॅस्टिकमुक्ती’ची चळवळ व्यापक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांनी सांगितले. प्लॅस्टिक बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्या आणि कोल्ड ड्रिंक्ससाठी प्लॅस्टिकऐवजी कॅन्सचा वापर वाढविण्यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम
कार्यक्रमानंतर वेण्णा लेक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वन विभागाच्या वाहनतळ परिसरापासून सुरू झालेल्या या मोहिमेत उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते आणि वन मंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान (Satara News) पार पडले. यामध्ये हिलदारी सदस्य, वनरक्षक, सफाई कर्मचारी तसेच वेण्णा लेक परिसरातील स्टॉलधारकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.






